
नांदेड – नांदेडमधील कौठा भागातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या राम बागेत चोरट्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचेच घर फोडल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेत चोरट्याने रोख साडे सहा लाख रुपये, सोन्याच्या दागिन्यांसह पोलिसाची पिस्तूल आणि ३० जिवंत काडतूसही लंपास केले आहेत. त्यामुळे आता या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील कार्यरत पोलीस हवालदार गजानन बळीराम कदम हे नवीन कौठा येथील रामबाग रेसिडेन्सी येथे राहतात. सध्या ते नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे क्राइम रायटर म्हणून काम पाहत आहेत. पोलीस हवालदार कदम यांचे कुटुंबीय महालक्ष्मी सणानिमित्त मूळ गावी गोरठा येथे १७ सप्टेंबर रोजी गेले होते. कदम मात्र आपल्या कार्यालयीन कामानिमित्त दिवसभर वजिराबाद येथील कार्यालयात हजर राहून १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरी परतले. यावेळी त्यांनी आपली शासकीय पिस्तूल आणि काडतूस हे घरामध्ये ठेवले. घरी कुणीही नसल्यामुळे ते जेवणासाठी रात्री घराबाहेर पडले. त्यानंतर पुन्हा ते आपल्या महत्वाच्या शासकीय कामासाठी वजिराबाद येथील कार्यालयात गेले. महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी रात्री उशिरापर्यंत काम करून ते तेथेच कार्यालयातच झोपले. परिणामी घरात कोणीही उरले नव्हते. चोरट्यांनी ही संधी साधली.
दुसऱ्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शासकीय पिस्तुलासह लाखोंचा ऐवज लंपास केला होता. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास कदम हे आपल्या रामबागेतील निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांना आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला. घराचे कुलूप तोडलेले होते. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडले होते. घरातील चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या घटनेमध्ये शासकीय पिस्तुलासह ३० जिवंत काडतूस, रोख ६ लाख ५० हजार रुपये तसेच सोन्याचे गंठण, सोन्याची चैन, दोन अंगठ्या असे एकूण पाच तोळे सोन्याचे दागिने किंमत जवळपास पाच लाख रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेत एकूण १६ लाख ६५ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणात कदम यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी भेट दिली. या घटनेतील चोरट्यांच्या शोधात नांदेड ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हा शाखेची पथकेही रवाना झाली आहेत
दुसरीकडे नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री खून, घरफोडी अशा गंभीर घटना घडल्या आहेत. या भागात रात्रीची गस्त नेमकी कुठे होते, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत १८ सप्टेंबरच्या रात्रीच शाहूनगर वाघाळा येथील पाण्याच्या फिल्टर टाकीजवळ संघरत्न उर्फ डोरेमॉन माधव वाघमारे या २० वर्षीय तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात सहा जणांना स्थानिक गुन्हा शाखेने निजामाबाद येथून जेरबंद केले आहे. या आरोपींनी संगनमत करून वादातून खून केल्याची कबुलीही दिली आहे. या खुनाचे नेमके कारण मात्र अद्यापही पुढे आले नाही. खोटा भागातील रामबाग येथील या घरफोडीच्या तपासात पिस्तूल आणि जिवंत काडतुसांचा शोध घेणे हे आता पोलिसांपुढे आव्हान निर्माण करणारे ठरले आहे.



