
नांदेड – श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रविवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान नवीन नांदेडातील विष्णूपुरी येथे काळेश्वर घाटावर ही घटना घडली आहे. हे दोन्ही तरुण श्री विसर्जनासाठी गोदावरी नदी परिसरात आले होते. यावेळी ते पोहण्यासाठी गोदावरी नदीत उतरले. यात त्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला.
देगलूर तालुक्यातील किनी येथील बजरंग बिरू येडुरे आणि मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील दीपक मारुती सोळुंके हे दोघेजण वाडी पाटी नजीकच्या मातोश्री प्रतिष्ठान या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. रविवारी ते गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीवर काळेश्वर मंदिर परिसरात पोहोचले. श्री विसर्जनानंतर त्यांनी पोहण्यासाठी गोदापात्रात उड्या घेतल्या. गोदावरी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कळताच जीवरक्षक दलाला पाचारण करण्यात आले. जीवरक्षक दलाने जीवरक्षक दलाने बजरंग येडूरे या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे तर दीपक सोळुंके या २० वर्षीय तरुणाच्या मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, विष्णूपुरीचे पोलीस पाटील या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणात दोन्हीही युवकांच्या नातेवाईकांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती दिली आहे.
काळेश्वर येथे १२ दिवसापूर्वी आजोबांच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. याच ठिकाणी आज रविवारी आणखी दोन तरूणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आता प्रशासन अथवा काळेश्वर संस्थानला सुरक्षात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा या ठिकाणी अशाच घटना होण्याची भीती आहे. या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.



