क्राईम

नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांविरुद्ध आता खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंसह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहनही उतरले मैदानात..!

रविवारी जिल्हाभरात कोंबिंग ऑपरेशन, तब्बल २७ मोठ्या बोटींसह १३ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची जोडगोळी पोहोचली थेट येळी-म्हहाटी पुलावर..!

नांदेड – जिल्ह्यात वाळू माफिया, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा रोखणार कोण असा प्रश्न पुढे येत असताना रविवारी नांदेड जिल्ह्यात खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन हे थेट गोदापात्रात उतरले. ही जोडगोळी बहुचर्चित आणि वाळू उपसासाठी कुप्रसिद्ध असलेल्या येळी- म्हहाटी घाटावर पोहोचली. या जोडगोळीने मुदखेड ठाणे हद्दीत सर्वाधिक १३ मोठ्या बोटी जप्त केल्या. जिल्ह्यात पहिल्यांदाच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित येत वाळू माफीयांचे कंबरडे मोडले आहे. रविवारी एकाच दिवशी झालेल्या कारवाईत जिल्ह्यात १३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत गोदावरी नदी पात्रातील तब्बल २७ मोठ्या बोटी, १३ लहान बोटी, ५ इंजिन, १०८ तराफे, चार हायवा, एक टेम्पो, एक ट्रॅक्टर ,एक पोकलेन मशीन आणि ५५६ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी नदीपात्रातील मार्कंड शिवार, विष्णूपुरी शिवार, पिंपळगाव निमजी शिवार, वाहेगाव शिवार, कल्लाळ, भनगी शिवारात नांदेड ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हा शाखेने छापेमारी केली. या छापेमारीत १ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ५ मोठ्या बोटी, २ छोट्या बोटी, ४०५ ब्रास रेती, १०३ तराफे असा एकूण २ कोटी ७७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सर्वात मोठी कारवाई ही मुदखेड पोलीस ठाणे हद्दीत झाली आहे. गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई करून वाळू उपसासाठी सज्ज असलेल्या मोठ्या अवजड यंत्रसामग्रीवर कारवाई केली. सर्वाधिक १३ मोठ्या बोटी येथे जप्त करण्यात आल्या आहेत. ५ छोट्या बोटी, ७५ ब्रास रेती असा एकूण ५ कोटी ११ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात वाळू माफिया, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा अनेक वर्षापासून सुरू आहे. या साखळीमुळे कोट्यवधींचा महसूल पाण्यात जात होता. वाळू माफियांशी संधान साधणारे महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारीही मालामाल होत होते. जिल्ह्यात वाळू माफियाविरुद्ध पोलीस कारवाई झाल्यानंतर महसूल विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते तर कधी महसूल विभागाला पोलिसांची साथ मिळत नसल्याची तक्रार केली जायची. आज रविवारी मात्र जिल्ह्यात अभूतपूर्व योग जुळून आला. एकाच दिवशी जिल्हाभरात वाळू माफियांची नाकाबंदी करत मुसक्या आवळण्यात आल्या.

उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील कौडगाव, कांबळज, येळी येथेही १४ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये आठ मोठ्या बोटी आणि सहा छोट्या बोटीचा समावेश आहे. या कारवाईत ७५ ब्रास रेती, एक पोकलेन मशीनही जप्त केली असून एकूण ३ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत मुदखेड रोडवर दोन हायवा जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी चालक संदीप नागोराव गजभारे,भीमराव रमेश मोरे, मालक संदीप विकास कदम, साहेबराव पुयड अशा चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असर्जन गाव पुलाजवळही एक टेम्पो जप्त केला असून देविदास गोविंदराव वैद्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव पोलीस ठाणे हद्दीत बिलोली उपविभागाचे पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि नायगाव पोलिसांनी नायगाव रस्त्यावर नाकाबंदी करून दोन विना क्रमांकाचे हायवा ट्रक जप्त केले. या प्रकरणात दत्ता निळकंठ राठोड आणि ज्ञानेश्वर भीमराव पांडुर्णे यांच्याविरुद्ध नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी बापू बिअर शॉपी समोर विना क्रमांकाचा एक हायवा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात आकाश संजय भरकडे आणि वैभव अच्युतराव दळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लिंबगाव पोलीस ठाणे हद्दीतही रविवारी पहाटेच्या सुमारास बोरगाव तेलंग येथील गोदावरी नदी पात्राच्या किनारी जुन्या गावठाणलगत अवैध वाळू उपसा करण्यासाठी जमवलेली साधनसामग्री आढळली. याप्रकरणी अर्जुन विलासराव क्षीरसागर, करण सुनीलराव क्षीरसागर, माधव लिंबाजी घुबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे पाच इंजिन, एक लोखंडी बोट, तराफे आढळून आले.
धर्माबाद पोलीस ठाणे हद्दीत नेहरू चौक येथे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करण्यात आली. याप्रकरणी प्रकाश चांदु बेर्जे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात रविवारी पोलीस दलाच्या वतीने राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये जप्त केलेल्या २७ मोठ्या बोटी, १३ छोट्या बोटी, ५ इंजिन, १०८ तराफे, चार हायवा, एक टेम्पो, एक ट्रॅक्टर, एक पोकलेन तसेच ५५५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या लोखंडी बोट आणि इंजिन नदीपात्राबाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून ते जागीच नष्ट करण्यात आले. तराफे डिझेलच्या सहाय्याने जाळण्यात आले. एकूण १३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या ठाण्यात सुरू आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, बिलोली उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर, इतवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील जुमडे, देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट, वैभव पडवळ तसेच नांदेड ग्रामीण, मुदखेड, उस्माननगर, लिंबगाव, नायगाव, धर्माबाद आणि स्थानिक गुन्हा शाखा तसेच स्थानिक दुय्यम अधिकारी यांच्यासोबतच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली आहे.

या कारवाईत पोलिसांनी २७ मोठ्या बोटींसह तर १३ लहान बोटी जप्त केल्या आहेत. यातील एका मोठ्या बोटीची किंमत ३० लाख रुपये इतकी आहे तर लहान बोटीची किंमत २० लाख रुपये आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या एका मोठ्या बोटीत तब्बल चार ते पाच हायवा ट्रकमध्ये बसेल इतकी रेती एकाच वेळी काढली जात होती. त्यामुळे दिवसभरात या लहान आणि मोठ्या बोटीच्या माध्यमातून सक्षन पंपाच्या माध्यमातून किती अवैध वाळू उपसा होत असावा याचा अंदाज येतो. त्यातच गोदावरी नदीचा किती मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत होता, यातून पर्यावरणाची ही हानी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अवैध वाळू उपसाच्या माध्यमातून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. जिल्हा पोलिसांनी या कारवाईच्या माध्यमातून त्यावर निश्चितपणे आळा घातला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!