क्राईम

नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापकाचा आत्मदहनाचा प्रयत्न..!

वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, समायोजनाच्या मागणीसाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न, शिक्षण विभागाकडून २०१९ मध्येच प्रकरण निकाली काढल्याचा दावा..!

नांदेड – शासन स्तरावरून शाळेची मान्यता काढलेली नसतानाही आपले समायोजन का केले नाही तसेच आपल्या सर्व मागण्या मान्य कराव्या, असे म्हणत एका मुख्याध्यापकाने नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. आत्मदहनाचा इशारा देताना मुख्याध्यापकाने हे कृत्य केले होते. १ ऑक्टोबर २०२६ रोजी या मागण्या संदर्भात मुख्याध्यापकाने जिल्हा परिषदेला आत्मदहनाचा इशारा दिला होता; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक बळीराम इरप्पा इराण्णा येरपूलवार यांनी या प्रकरणात वजीराबाद येथे तक्रार दिली आहे. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माध्यमिक शिक्षण विभाग विभागात शेख महंमद बाबूसाब याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. त्याला कार्यालयात का गोंधळ घालत आहेत असे विचारले असता माझ्या शाळेची मान्यता का काढली असे म्हणून त्याने हातातील पिशवीमधून एका प्लास्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. स्वतःला आगपेटीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक येरपूलवार आणि कार्यालयातील उपस्थित कर्मचारी दीपक महालिंगे, सुधीर शिंदे यांनी शेख मोहम्मद याच्या हातातील आगपेटी काढून घेतली. माझ्या शाळेची मान्यता पूर्ववत करा नाहीतर मी स्वतःला संपवून घेतो, असेही तो धमकावत होता. त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी शेख मोहम्मद बाबूसाब. याच्याविरुद्ध वजीराबाद पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुखेड येथील मोहम्मद जाकीर हुसेन उर्दू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता २०१९ रोजी काढण्यात आली होती; मात्र या प्रकरणात मुख्याध्यापक शेख मोहम्मद बाबूसाब यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे अपील केले असल्याचे सांगितले जात आहे. शासनस्तरावरून आपल्या शाळेची मान्यता अद्याप काढलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या शाळेची मान्यता काढताना शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन इतर शाळेत करण्यात आल्याचे सांगितले आहे. शेख मोहम्मद हा स्वतःला मुख्याध्यापक म्हणून घेत असला तरीही तो मुख्याध्यापक नाही, असेही शिक्षण विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे त्याचे समायोजन होऊ शकले नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे या सर्व प्रकरणात मुख्याध्यापक शेख महंमद बाबूसाहब यांनी आपला पत्रव्यवहार सुरूच ठेवला आहे एक ऑक्टोबर रोजी त्यांनी हे याबाबत आत्मदहनाचा इशारा देणारे पत्र शिक्षणाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनाही दिले होते. त्यानुसार पुढील कारवाई अपेक्षित होती; मात्र प्रत्यक्षात ती झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे आज १३ ऑक्टोबर रोजीही सदरील शेख मोहम्मद बाबूसाब यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज दिला होता. या अर्जाद्वारे त्याने आपल्या १ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अर्जाची आठवण करून दिली होती; मात्र हा अर्ज गांभीर्याने न घेतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत. वजीराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!