क्राईम

अर्धापूर तालुक्यात तलाठ्याने केली चक्क तहसीलदारांना मारहाण

वाळू माफियावर कारवाई का करत आहात म्हणत केली शिवीगाळ, महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट..! कारवाई कुणाची पोलिसांची की महसूलची?

नांदेड – वाळूमाफियांवर कारवाई का केली असे म्हणत एका तलाठ्याने चक्क तहसीलदारालाच जबर मारहाण केल्याचा गंभीर प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात घडला. याप्रकरणी त्या तलाठ्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तो तलाठी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. एकूणच नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचे राज्य आता आले की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळूमाफीयांच्या समर्थनार्थ राजकीय मंडळी खुले आम पुढे येत असताना आता महसूलमध्येही यासाठी जणू स्पर्धाच निर्माण झाल्याचे चित्र आहे. अर्धापूर मध्ये तहसीलदारांना झालेल्या मारहाण प्रकरणात जिल्हास्तरावरील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात तोंडावर बोट ठेवले आहे.

जिल्ह्यात वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. या धाडसत्रात महसूल विभागही कधीकधी सहभागी होत असतो. अर्धापूर पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पिंपळगाव पाटी येथील विश्व प्रयाग हॉटेलमागे मोकळ्या जागेत हायवा क्रमांक एमएच २६ सीएच १६२९, एमएच २६ सीएच २८७७, एमएच २१ बीएच २६३५ आणि टिप्पर क्रमांक एमएच ४८ जे ०८८५ यामध्ये वाळू भरलेली असताना थांबून होते. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता गर्दीचा फायदा घेऊन वाहनाचे चालक पळून गेले. पोलिसांनी तीन हायवा आणि एक टिप्पर तसेच रेती असा १ कोटी १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच कारवाईवरून अर्धापूर तहसील कार्यालयांतर्गत मोठा गंभीर प्रकार पुढे आला आहे. प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांना कार्यालयातील तलाठी प्रदीप वामनराव पाटील जे की पिंपळगाव म. येथील महसूल अधिकारी आहेत यांनी शिंदे यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली. ५ डिसेंबर रोजी प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे हे अर्धापूरचे मंडळ अधिकारी नवीन रेड्डी लक्कडवार, दाभडचे मंडळाधिकारी राजू तुकाराम इंगळे, मालेगावचे मंडळ अधिकारी रामदास दुधाटे, निमगाव च ग्राम महसूल अधिकारी बालाजी वसमतकर, मालेगावचे ग्राम महसूल अधिकारी आकाश कांबळे, बारसगावचे ग्राम महसूल अधिकारी राहुल चव्हाण यांच्या समवेत रात्री दहा वाजता गस्त घालत असताना पिंपळगाव शिवारात विश्व प्रयाग हॉटेल देगाव बु. या ठिकाणी अवैध रेती वाहतूक करणारे चार वाहने ज्यामध्ये तीन हायवा आणि एक टिप्पर सापडले. सदरील वाहनावर नियमानुसार कारवाई करताना पिंपळगाव म.चे ग्राम महसूल अधिकारी प्रदीप वामनराव पाटील याने तुम्ही ही कारवाई का करत आहात असे म्हणून तहसीलदार शिंदे यांच्याशी हुजत घातली. त्यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली. याप्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात तलाठी प्रदीप पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा प्रदीप पाठलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कारवाई कुणाची पोलिसांची की महसुलची..? दरम्यान या घटनेबाबत आणखी एक गंभीर प्रकार पुढे आला आहे. सदरची कारवाई पोलिसांनीच केली असा गवगवा करत पोलीस विभागाकडून शनिवारी दुपारीच या घटनेची प्रेस नोट माध्यमांना पाठवण्यात आली. त्यामध्ये कारवाईसाठी सहभागी एकही महसूल अधिकाऱ्याचे नाव नाही. पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेतली आहे. पण संध्याकाळी महसूल विभागातील अनागोंदी कारभारामुळे हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांसह ही कारवाई केल्याचे नमूद आहे या कारवाईदरम्यानच तलाठी प्रदीप पाटील याने शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नमूद आहे. त्यामुळे या कारवाईदरम्यान खुद्द तहसीलदार शिंदे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठीही उपस्थित होते. ही बाब पोलिसांनी आपल्या प्रेस नोट मध्ये नमूद केली नाही. एकूणच आता ही कारवाई नेमकी केली कोणी हा प्रश्नही पुढे आला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका कारवाईमध्ये महसूल विभागानेही सुधारित प्रेस नोट पाठवून पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेशाबाबत स्पष्टता आणली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!