क्राईम

नांदेडमधील चार बालकांच्या मृत्यू प्रकरणात महापालिकेच्या उपअभियंता, कनिष्ट अभियंत्यावरही गुन्हा दाखल 

मुख्य कंत्राटदार अजूनही मात्र मोकाट, आरोपींची संख्या झाली चार

नांदेड – नांदेड शहरातील देगलूर नाका भागात १६ एप्रिल रोजी खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात महापालिकेच्या महिला उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या प्रकरणातील मुख्य कंत्राटदार मात्र अजून मोकाट आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या  दखल घेतल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

नांदेडमध्ये चार बालकांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी द्वि सदस्यीय समिती नेमून अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार १७ एप्रिल रोजी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय महापालिकेतील उप अभियंता शिवकन्या जायभाये आणि कनिष्ठ अभियंता किरण सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात मुख्य कंत्राटदाराला अभय दिले जात असल्याचा आरोप केला जात होता. या संपूर्ण घटनेची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील घेतली आहे.

याप्रकरणी दोन आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार अधिकार आयोगाने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणात दोन आरोपींची वाढ करण्यात आली. त्यात महापालिकेच्या उपअभियंता शिवकन्या जायभाये आणि कनिष्ठ अभियंता किरण सूर्यवंशी या दोघांना आरोपी करण्यात आले. मात्र मुख्य कंत्राटदार अजूनही मोकाट आहे. विशेष म्हणजे या दोन कर्मचाऱ्यांना विनाकारण गोवल्याची चर्चा सुरू आहे. मुख्य कंत्राटदारांना मात्र अभय दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. आता यापुढे आणखी या प्रकरणात कोण कोण उगवले जाणार याकडेही लक्ष लागले आहे. खुद्द पालकमंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले होते. त्यानंतरही मुख्य ठेकेदार अद्यापही राज्याबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!