
नांदेड – नायगाव पंचायत समिती कार्यालयास आमदार राजेश पवार यांनी २७ ऑक्टोबर रोजी भेट देऊन घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी ग्रामीण निर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर अधिकारी लाच घेत असल्याची बाब उघड केली होती. यात त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही लाच घेत असल्याचे कॅमेरासमोर कबूल केले होते. ही बाब स्पष्ट होताच मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत नायगाव येथे कार्यरत असलेल्या नऊ जणांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नायगाव तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असल्याच्या तक्रारी आमदार राजेश पवार यांच्याकडे गेल्या होत्या. या तक्रारीनंतर आमदार राजेश पवार यांनी २७ ऑक्टोबर रोजी नायगाव पंचायत समिती कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांनी नागरिकांपुढे उभे केले. घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी पैसे घेतात की नाही अशी थेट विचारणा केली. त्यावेळी लोकांसमोर या कर्मचाऱ्यांनी आपण पैसे घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात पैसे घेणार नाही, अशी शपथही आमदार पवार यांनी त्या कर्मचाऱ्यांना दिली. या सर्व बाबींचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केली. त्याचवेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांच्याशी या प्रकरणात चर्चा केली होती आणि कारवाईबाबत निर्देश दिले होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांनी या प्रकरणात नायगाव पंचायत समिती येथे कार्यरत असलेले अर्जुन प्रभाकरराव जाधव, शेख समीर, ओमप्रकाश पांडागळे, सुजित दाताळकर धोंडीबा उपासे, संतोष आडे, ऋषिकेश सरोदे, मोहम्मद इब्राहिम आणि संतोष वडजे या नऊ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांनी सीएससी ई गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड यांना नायगाव पंचायत समिती येथे अन्य नऊ गृहनिर्माण अभियंता उपलब्ध करून देण्याबाबतही कळविले आहे.
कंत्राटीवर कारवाई…कायम कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काय..? नायगावचे आमदार राजेश पवार यांनी २७ ऑक्टोबर रोजी नायगाव पंचायत समितीसह नायगाव तहसील कार्यालयाला ह भेट दिली होती. या भेटीत नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर नसल्याची बाब पुढे आली होती. आमदार पवार यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला दस्ती टोपीचा आहेर केला होता. इतकेच नव्हे तर गटविकास अधिकारीही कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्याही खुर्चीला त्यांनी आहेर करून गांधीगिरी केली होती. आमदार राजेश पवार यांच्या भेटीनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यावर कार्यमुक्तीची कारवाई झाली; मात्र कायम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडेही आता लक्ष लागले आहे.



