
नांदेड :- नांदेडमध्ये सतत १३ वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यंदा २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य, उर्दू, हिंदी, मराठी साहित्याची संगीतमय प्रेमयात्राही सादर होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण या प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल राहणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम पहिल्याच दिवशी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. यात त्या भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते त्या सादर करणार आहेत.
दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम सादर होईल. ते स्वतः या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सह गायक म्हणून रविंद्र आहिरे हे देखील यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता बापू दासरी यांच्या पुढाकारातून रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचे फ्युजन असलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मिलिंद तुळणकर-पुणे, कल्याणी देशपांडे-पुणे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ.गुंजन शिरभाते, आसावरी जोशी (रवंदे), बालासाहेब पाटील हे कलावंत सहभागी होतील. २० ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम सादर होणार आहे. शुभंम बिरकुरे व स्थानिक कलावंत यात सहभागी होतील.
२१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता प्रा.सुनिल नेरलकर यांच्या पुढाकारातून पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावरील आधारीत स्वर सरिता हा कार्यक्रम होणार आहे. यात अभिनय रवंदे, प्रशांत गाजरे, विश्वजित कोलंबीकर, अनहद वारसी, चिन्मय मठपती, अदिती रवंदे व ईश्वरी जोशी हे सहकारी कलावंत सहभागी होतील.
२२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून व पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून १९६० ते १९८० या काळातील मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मराठी गितांचा रुपेरी सोनसळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, गायक सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी आदी मान्यवर गायक सहभागी होणार आहे. सायंकाळी ५:३० वाजता नांदेडकरांना एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून व सुरेश जोंधळे व मकरंद दिवाकर यांच्या सहकार्यातून काफीला, कोल्हापूर निर्मित जियारत हा मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्यांची संगीतमय प्रेमयात्रा हा कार्यक्रम सादर होणार आहे. सतीश तांदळे यांचे दिग्दर्शन, संकलन व लेखन असलेला हा कार्यक्रम संगीतकार ऋषिकेश देशमाने यांच्या साह्याने रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण निखिल पुजारी आणि सतीश तांदळे हे करणार आहेत. तर कार्यक्रमात ओंकार पाटील, सुरज कांबळे, कौस्तुभ शिंदे आणि संपदा माने यांचे गायन होणार आहे. नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत सढळ हाताने मदत करावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



