
नांदेड – लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणासाठी नांदेड दक्षिणमध्ये २८६ तर देगलूर विधानसभा मतदारसंघात १७० निवडणूक कर्मचारी गैरहजर राहिल्याची बाब पुढे आली आहे. या पहिल्याच प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
नांदेड दक्षिण मतदार संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शुक्रवारी शहरातील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी जवळपास १ हजार ८०० कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. त्यामध्ये २८६ कर्मचारी अनुपस्थित आढळले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली.
देगलूर विधानसभा मतदारसंघातही २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रशिक्षणात १ हजार ७५२ पैकी १ हजार ५८२ निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. तर १७० कर्मचारी अनुपस्थित आढळले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे असल्याचे देगलूर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले. अनुपस्थितीबाबत योग्य खुलासा न आल्यास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कर्तव्यास उपस्थित राहण्यास कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यावर निश्चितपणे कारवाई होईल असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी नांदेडमध्ये श्री गुरूग्रंथ साहिब भवन येथे हे निवडणूक प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविक नितेशकुमार बोलोलू, प्रशिक्षण प्रमूख तथा नायब तहसिलदार निवडणूक तहसिल कार्यालय नांदेड यांनी केले. यावेळी प्रशिक्षण मंचावर उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, तहसीलदार उमाजी बोथीकर, मनपा शिक्षणाधिकारी आर.आर. पातळे, नायब तहसिलदार स्वप्नील दिगलवार उपस्थित होते. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी राजकूमार कोटूरवार, बालाजी जाधव, संजय भालके, आर.जी. कुलकर्णी, बाबूराव जाधव, शेख जमील व महमद आखीब तथा निवडणूक विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
लोकसभा निवडणूक काळात प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येवू घातलेल्या समस्या कोणत्या आहेत याचाही प्रशिक्षण घेताना विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास मतदान घेणे अधिक सोईचे व सोपे होते, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम प्रशिक्षणात ते बोलत होते.