प्रशासकीय

लोकसभेचे उमेदवार चिखलीकरांवर एकही गुन्हा नाही, कर्जही निरंक

चव्हाणांविरुद्ध ४२० चा गुन्हा तर भोसीकरविरुद्ध सात गुन्हे दाखल

अनुराग पोवळे 

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघात यंदाही तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत. या तीन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षण, मालमत्ता, कर्ज, गुन्हे आदींची माहिती दिली आहे. त्यात विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याविरुद्ध एकही गुन्हा दाखल नाही तसेच त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याचेही स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकरविरुद्ध शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी सात फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले होते. यातील आठ अर्ज ५ एप्रिल रोजी झालेल्या छाननीमध्ये अवैध ठरले आहेत. नांदेड लोकसभेसाठी प्रमुख उमेदवार असलेल्या तीनही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात तिरंगी लढतीची चिन्हे असली तरीही वंचितच्या उमेदवाराला या निवडणुकीत किती मिळतील हा प्रश्नही पुढे येत आहे. प्रमुख उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचे उत्पन्न २४ लाख ७४ हजार ८११० रुपये इतके आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम ५ लाख ९५ हजार ९११ रुपये आहे. तर त्यांच्या सौभाग्यवतीकडे २ लाख ६१ हजार ९६० रुपये रोख स्वरूपात आहेत. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचे २०२२- २३ चे उत्पन्न ११ लाख ६१ हजार ५० रुपये इतके आहे.

रोख रक्कम २४ लाख ४३ हजार ८९० रुपये इतकी आहे तर चव्हाण यांच्या सौभाग्यवतींकडे १ लाख १० हजार रुपये रोख स्वरूपात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांचे २०२२- २३ चे उत्पन्न ४ लाख ८५ हजार ९८५ रुपये इतके आहे तर आजघडीला रोख रक्कम ३ लाख २ हजार रुपये इतकी आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघातील या तीनही उमेदवाराकडे सोने असल्याचे प्रतिज्ञपत्रात नमूद करण्यात आले आहे. भोसीकर यांच्याकडे १०० ग्राम सोने आणि शंभर ग्राम चांदी आहे तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्याकडे १८ लाख २० हजारांचे सोने आहे. त्यांच्या सौभाग्यवतींकडे २४ लाख ५० हजारांचे सोने उपलब्ध आहे. विद्यमान खासदार चिखलीकर यांच्याकडेही ६ लाख ८२ हजारांचे तर त्यांच्या सौभाग्यवतींकडे २७ लाख २८ हजार रुपयांचे सोने आहे.

चिखलीकरांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची किंमत ५ कोटी ४० लाख २० हजार रुपये इतकी आहे तर त्यांच्या सौभाग्यवतींच्या नावे ४ कोटी ३४ लाख ८२ हजार ३८१ रुपये किंमतीची संपत्ती आहे.

उमेदवारांवर असलेल्या कर्जाची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे भोसीकर यांच्यावर २८ लाखांचे कर्ज आहे तर काँग्रेसचे चव्हाण यांच्यावर १४ लाख २३ हजार ६६३ रुपयांचे कर्ज आहे. विद्यमान खासदार चिखलीकर यांच्यावर मात्र कोणतेही कर्ज नाही. दुसरीकडे त्यांच्या सौभाग्यवतींवर १ कोटी ६१ लाख १२ हजार ६७३ रुपयांचे कर्ज आहे.

गुन्ह्यांच्या बाबतीतही या प्रतिज्ञापत्रात माहिती द्यावी लागली आहे. वंचितचे भोसीकर यांच्याविरुद्ध सात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आधी गुन्ह्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्याविरुद्धही फसवणुकीचा गुन्हा नायगाव येथे दाखल आहे. चिखलीकर यांच्याविरुद्ध मात्र कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

वसंतराव बी.कॉम तर भोसीकर बीए, एलएलबी…         नांदेड लोकसभा मतदार संघासाठी रिंगणात असलेल्या तीन प्रमुख उमेदवारांच्या शिक्षणामध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचे शिक्षण बी.कॉम झाले आहे तर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर हे बीए, एलएलबी आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण झाले आहे. रिंगणातील हे तीनही उमेदवार सामाजिक माध्यमावर ऍक्टिव्ह आहेत. त्यामध्ये प्रतापराव चिखलीकर यांचे सामाजिक माध्यमावर कार्यरत आहेत. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवरही ते ऍक्टिव्ह आहेत. वसंतराव चव्हाण यांचेही फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन अकाउंट ऍक्टिव्ह आहेत. तर भोसीकर हेही फेसबुक आणि ‘एक्स’वर कार्यरत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!