
नांदेड :- भोकर तालुक्यातील मोघाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मौजे इळेगाव येथे डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले आहेत. चार दिवसापासून सुरू असलेल्या या डेंग्यू उद्रेकाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी इळेगावास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. अमृत चव्हाण नांदेड यांनी भेट दिली. त्यांनी रूग्णांची भेट घेऊन गावात कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धूर फवारणी, अळीनाशक औषधी फवारणी करून वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. परिसर स्वच्छता, आठवड्यातून एक दिवस सर्व पाणी साठे घासून, पुसून कोरडे करावे व कोरडा दिवस पाळवा जेणे करून डेंग्यू डास होणार नाहीत याबाबतही सूचना दिल्या आहेत.
भोकर तालुक्यातील इळेगाव येथे जवळपास ११०० लोकसंख्या आहे. या गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी गेल्या चार ते पाच दिवसापासून येथे डेंग्यू साथीचा उद्रेक झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार येथे केवळ तीन रुग्ण चिकन गुनियाचे असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात येथे रुग्णांची संख्या अधिक असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या साथीच्या उद्रेकानंतर आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपायोजना सुरू केल्या आहेत. खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी इळेगाव येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. गावात कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धूर फवारणी, अळीनाशक औषधी फवारणी करून वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, साथरोग अधिकारी डॉ. अन्सारी, भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल होगे, डॉ. व्यंकटेश निलावार मोघाळी, डॉ. राजपुत, जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले, आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) भोकर मोहन पेंढारे , आरोग्य निरीक्षक (हत्तीरोग) भोकर, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ व्यंकटेश पुलकंठवार, निकीता कांबळे, आरोग्य सहाय्यक दादाराव माचेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र मोघाळीचे आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, हत्तीरोग कर्मचारी उपस्थित होते.



