
नांदेड – बँकेचे बनावट व्हाउचर वापरून तब्बल १ कोटी ९ लाख १४ हजार ५२१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार नांदेड येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे संचालक बालाजी शिंदे याच्यासह इतर ४१ बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वर्कशॉप येथे एसटीची को-ऑपरेटिव्ह बँक आहे. या बँकेत ११ फेब्रुवारी २०२५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत बँकेचे संचालक बालाजी शिंदे याच्यासह बँकेच्या इतर ४१ अधिकारी, कर्मचारी तसेच सभासदांनी संगनमत करून नियमबाह्य पद्धतीने बँकेचे बनावट व्हाउचर भरले. या व्हाउचरद्वारे सर्वांनी १० महिन्यातच तब्बल १ कोटी ९ लाख १४ हजार ५२१ रुपयांचा अपहार केला. ही बाब बँकेच्या ऑडिटमध्ये पुढे आली.
बँक निरीक्षक सतीश प्रल्हाद गर्जे यांनी याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संचालक बालाजी शिंदे, बँक अधिकारी, कर्मचारी आणि बँकेचे सर्व सभासद यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हा शाखेकडे तपास सोपविला जाणार..! या अपहार प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपहार प्रकरणात बँकेचे संचालक बालाजी शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही पुढे आली आहे. शिंदे हा एसटीचा वाहक आहे. एका वाहकाकडूनच केलेल्या या अपहार प्रकरणाची आता चर्चा सुरू झाली आहे.



