
नांदेड – मनपा अतिक्रमण विभागातील समन्वयक विशाल सोनकांबळे हे पथकातील कामगारांना अरेरावीची भाषा करून अपमानजनक वागणूक देत मानसिक त्रास देत आहेत. शनिवारी विशाल सोनकांबळे व इतर पाच कर्मचाऱ्यांनी खुर्च्या बाहेर काढून देण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे त्यांना व इतर पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्मचारी संघटना स्थापन करण्याच्या कारणावरून महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये हे शीतयुद्ध दीड वर्षापासून उद्भवले असल्याचे स्पष्ट होत आहे.
३१ मे रोजी दुपारी बारा वाजता रस्ता क्र. २६ श्री गोविंदसिंघजी स्टेडियमच्या पाठीमागील रस्त्यावरील कापडी टेन्ट काढण्याचे कर्तव्य बजावत असताना नांदेड उत्तरचे अतिक्रमण समन्वयक अनिल चौदंते यांना विशाल सोनकांबळे यांनी फोन करून गणेशनगर रोड लेबर कॉलनी, पाण्याच्या टाकीखाली गोडावूनमधून अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेल्या खुर्च्या काढून देण्यासाठी कर्मचार्यांना घेवून या असे म्हटले. त्यामुळे चौदंते यांनी कामगारांना सदर ठिकाणी पथकामध्ये असलेल्या चार चाकी वाहनात घेवून गेले. त्याठिकाणी विशाल सोनकांबळेसह १० ते १५ कायम कर्मचारी उपस्थितीत होते. विशाल सोनकांबळे यांनी कामगारांना गोदामातून प्लास्टिकच्या खुर्च्या काढून बाहेर आणून द्या, असा आदेश दिला. तेव्हा सदरचे काम तर खाजगी आहे आणि एका संघटनेच्या बैठकीसाठी आमच्याकडून करून घेत आहेत, असे म्हणून कामगारांनी सदरच्या प्लास्टिक खुर्च्या बाहेर आणण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी सांगितलेले काम का करत नाही. असे म्हणत विशाल सोनकांबळेसह ५- ६ कायम कर्मचार्यांनी सदर कामगारांना थापड बुक्याने मारहाण केली. उत्तरचे समन्वयक चौदंते यांनी आमचे वाद सोडवून आम्हाला तेथून काढून दिले.
तद्नंतर विशाल सोनकांबळे यांनी शैलेष मोतीराम कांबळे, राजेश उत्तम माने, प्रसन्नजित चंद्रकांत अवताडे यांच्याविरुध्द शिवाजीनगर, पोलिस स्टेशन येथे ५ ते ६ कायम कर्मचाऱ्यांना साक्षी ठेवून, त्याची नावे देवून तक्रार दिली. त्या तक्रारीवर शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे तिघांवर अदखल पात्र गुन्हा दाखल झालेला आहे. विशाल सोनकांबळे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन पथकामध्ये असलेल्या कंत्राटी व कायम कर्मचार्यावर मानसिक दबाव टाकून काम करून घेत आहेत.
नोंदणीकृत असलेल्या नांदेड मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या पदसिध्द पदाधिकाऱ्याकडून इतर संघटनेच्या बैठकीसाठी अतिक्रमण मोहीममध्ये जप्त केलेल्या प्लास्टिक खुर्च्या व इतर साहित्याचा गैरवापर करण्याचे कृत्य करत आहेत. ते कृत्य करण्यास आम्ही विरोध केल्यास कर्मचाऱ्यांना कायम कर्मचार्यासोबत संगनमत करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. विशाल सोनकांबळे यांच्या त्रासाला कंटाळून सदर कामगार शैलेष कांबळे, राजेश माने, प्रसन्नजित अवताडे, सुनील लोखंडे, अविनाश दुधमल, सुदर्शन आठवले आदींनी त्यांच्या निलंबनाची मागणी करणारे निवदेन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्यामार्फत शिष्टमंडळाने दिले आहे.
महापालिकेत कंत्राटीविरुद्ध कायम कर्मचारी असा नवा संघर्षही पेटला…नांदेड महापालिकेत असलेल्या दोन कर्मचारी संघटनामधील शीतयुद्ध आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. शहरातील शिवाजीनगर ठाण्यात या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रारी करण्यात आल्या असून एका तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी दुसऱ्या संघटनेने दिलेल्या तक्रारीनुसार थेट कायम कर्मचाऱ्यांनाच निलंबित करावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे महापालिकेत आता कंत्राटी विरोधात कायम कर्मचारी असा नवा संघर्षही पेटला आहे. हा सर्व खटाटोप एका संघटनेच्या होत असलेल्या कार्यकारणीवरून सुरू झाला आहे. या कार्यकारणीला जुन्या संघटनेने अदृश्य स्वरूपात विरोध दर्शविला असला तरीही महानगर कार्यकारिणी होणारच आणि ती लवकरच होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेत कर्मचारी संघटनामधील हा वाद नेमका कोणत्या स्तराला जातो आणि त्यावर महापालिका प्रशासन काय तोडगा काढते, याकडेही आता लक्ष लागले आहे.