
नांदेड – पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीदरम्यान एका भरधाव ट्रकने पोलीस जमादारास उडवल्याची घटना शनिवारी पहाटे अर्धापूर तालुक्यातील चोरंबा पाटी येथे घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी रात्री चोरंबा पाटी येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. पहाटे दोन वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगातील ट्रकने पोहेकॉ. राम मोगाजी पवार (बक्कल नंबर १७६६ ) यांना जबर धडक दिली. यात पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.