महापालिका

अहो आश्चर्यम् … सेवानिवृत्तीच्या वयानंतरही बजावली चक्क तीन वर्ष अधिक सेवा..!

नांदेड महापालिकेचा वरिष्ठ लिपिक निलंबित, कार्यालय अधीक्षकांनाही बजावली नोटीस, त्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी सुरू

नांदेड – सेवानिवृत्तीचे ५८ वर्ष वय झाल्यानंतरही नांदेड महापालिकेत नगर रचना विभागातील रमेश खंडेराव संगमकर यांनी तीन वर्ष अधिकची सेवा बजावली असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे संगमकर यांनी महापालिका प्रशासनाकडे स्वेच्छा सेवा निवृत्तीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी हा अर्ज दिला नसता आणखी किती काळ त्यांनी सेवा केली असती हा प्रश्नही पुढे आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संगमकर यांना एप्रिलमध्ये २०२२ पासून सेवानिवृत्त करण्यात आले आहे. या प्रकरणात महापालिकेच्या आस्थापना विभागाचे वरिष्ठ लिपिक सारंगधर पुंडलिकराव भुरके यांना निलंबित करण्यात आले असून कार्यालय अधीक्षक घंटेवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नांदेड महापालिकेच्या नगर रचना विभागात अनुरेखकपदी कार्यरत रमेश खंडेराव संगमकर हे यांच्या मूळ सेवा पुस्तकेनुसार त्यांचा जन्म दिनांक ११ जानेवारी १९६४ हा आहे. त्यांना नियत वयोमानानुसार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांच्या सेवा पुस्तकेच्या पहिल्या पानावर जन्म दिनांक १९६९ हे जन्मसाल होते. त्याच आधारे वय गृहीत धरून त्यांना  वाढीव सेवा करता आली. मात्र त्यांच्या सेवा पुस्तिकेतील मूळ कागदपत्रावर त्यांचा जन्म दिनांक ११ जानेवारी १९६४ हा होता. या त्यांच्या मूळ दिनांकाकडे महापालिकेच्या आस्थापना विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी त्यांना तीन वर्ष अधिक सेवा बजावता आली. सर्व सेवाविषयक लाभही त्यांना मिळाले. हा प्रकार एप्रिलमध्ये उघड झाल्यानंतर त्यांना १५ एप्रिल २०२५ रोजी महापालिकेने ३१ जानेवारी २०२२ पासून अनुरेखक या पदावरून सेवानिवृत्त करून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
नांदेड महापालिकेत हा प्रकार पहिल्यांदाच झाला असे नाही. यापूर्वीही सहाय्यक आयुक्त राजेश चव्हाण यांनाही सहा महिने अधिक कार्यकाळ सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून उपभोगता आला होता. या प्रकरणी त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे महापालिकेने सांगितले त्याचवेळी आता संगमकर यांचीही विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे आस्थापना विभागाच्या उपायुक्त सुप्रिया टवलारे यांनी सांगितले. या प्रकरणी महापालिकेने कारवाईचा बडगाही उगारला आहे. आस्थापना विभागाचे वरिष्ठ लिपिक सारंगधर भुरके यांच्याविरुद्ध कर्तव्यात निष्काळजीपणा करणे यास्तव शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. त्यांना तात्काळ निलंबित आहेत करण्यात आले आहे. दुसरीकडे कार्यालय अधीक्षक घंटेवाड यांनाही महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी महापालिकेने आता सर्व सेवा पुस्तिकांचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याचेही उपायुक्त सुप्रिया टवलारे यांनी सांगितले.

एकूणच महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तिकेकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष का केले असावे आणि असे प्रकार वारंवार का घडत असावे हाही एक संशय संशोधनाचा विषय झाला आहे. महापालिकेत दोन प्रकरणे उघड झाले असले तरीही आणखी दोन नावे असेच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये एक महिला कर्मचारी तसेच एका पुरुष कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्या प्रकरणावर महापालिकेच्या आस्थापना विभागाने पडदा टाकला असला तरी महापालिकेत त्या एका महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्यांने अधिक काळ सेवा बजावली असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!