महापालिका

नांदेडमध्ये अवैध नळधारकांना शेवटची संधी, ३१ मे नंतर महापालिका गुन्हे दाखल करणार

शहरातील अधिकृत प्लंबरना बैठकीत दिल्या सूचना, पाणी कर वेळेत भरण्याचेही केले आवाहन 

नांदेड- शहरातील अनधिकृत अनळधारकांना आपले नळ अधिकृत करण्यासाठी नांदेड महापालिकेने १ मे ते ३१ मेपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत अवैध नळधारकांनी आपले कनेक्शन अधिकृत न केल्यास ३१ मे नंतर महापालिका कठोर कारवाई करणार आहे. अशा नळधारकाविरुद्ध महापालिका थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणार आहे.  नांदेड महापालिकेने २५ एप्रिल रोजी इतवारा पोलीस ठाण्यात १७ नळ धारकाविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
नांदेड महापालिका हद्दीअंतर्गत आज घडीला ६४ हजार ८५८ अधिकृत नळ धारक आहेत. पण त्याचवेळी शहरातील काही भागात अनधिकृत नळ असल्याची बाबही महापालिकेच्या पाहणीमध्ये पुढे आली आहे. या संदर्भाने महापालिकेने अशा अवैध नळधारकांना एक संधी देताना ३१ मे पर्यंत आपले नळ अधिकृत करून घ्यावेत, असे आवाहन केले आहे. या मुदतीत नळ कनेक्शन अधिकृत न केल्यास कारवाईचा बडगा महापालिकेकडून उभारला जाणार आहे. अवैध नळ घेणाऱ्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
महापालिकेने ३१ मे पर्यंत दिलेल्या मुदतीत अवैध नळ धारकांनी आपले नळ अधिकृत करून घ्यावेत, यासाठी महापालिकेच्या अधिकृत प्लंबरनाही सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या भागात अनाधिकृत नळधारक असल्यास त्याने आपला नळ अधिकृत करून घ्यावा, याबाबतची माहिती सदर नळ धारकाला या प्लंबरनी द्यावी अशा सूचना गुरुवारी झालेल्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.  महापालिकेचे शहर अभियंता सुमंत पाटील, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश कांबळे, उपअभियंता नरेंद्र सुजलेगावकर, उपअभियंता संघरत्न सोनसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अधिकृत प्लंबरना या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपले नळ अधिकृत करण्यासाठी नांदेड महापालिकेच्या मुख्यालयात ११४ क्रमांकाच्या कक्षात स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात आले आहे.  कार्यालय अधीक्षक खदीर यांच्या नियंत्रणाखाली हे काउंटर सुरू आहे. अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी ४ हजार ५०० रुपये महापालिकेकडे भरावे लागणार आहेत. त्यानंतर आपला नळ अधिकृत होणार आहे. अशा अवैध नळधारकांनी आपला नळ वेळेत आणि दिलेल्या मुदतीत ३१ मे पर्यंत अधिकृत करून घ्यावा, असे आवाहनही नांदेड महापालिकेचे उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी केले आहे.

वेळेत पाणी कर भरण्याचे आवाहन…नांदेड महापालिकेला शहरात पाणीपुरवठा करताना अनेक बाबीवर खर्च करावा लागतो. त्यामध्ये जलशुद्धीकरणासाठी आवश्यक असलेली रसायने, विद्युत पंपाची देखभाल दुरुस्ती, विद्युत देयके, जलवाहिनी गळती दुरुस्ती, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाची देयके आदी बाबींचा समावेश आहे. त्यामुळे नळधारकांनी आपला पाणीकर वेळेत भरावा, असे आवाहनही अभियंता कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!