
नांदेड – नांदेड येथील दोन पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काल ७ ऑगस्ट रोजी धडकले. यामध्ये जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजकुमार शिंदे यांना पुणे शहर पोलीस उप आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातच कार्यरत असलेले अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना पदोन्नतीने आता नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक देण्यात आली आहे.
राज्यातील बारा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश ७ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने काढले आहेत. त्यामध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि मनिष कलवानिया यांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे नांदेडमध्येच कार्यरत असलेले अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना नांदेड पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीने नेमणूक देण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांना पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे आता रुजू होणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनायककुमार राठोड यांची नेमणूक केली आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची बदली करण्यात आली असून ते आता पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून रुजू होणार आहेत.
विजयकुमार मगर आता लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य..! नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी २४ ऑगस्ट २०१९ ते २० सप्टेंबर २०२० या ११ महिन्याच्या कार्यकाळात कार्यरत विजयकुमार मगर यांची राज्य शासनाने पुणे शहरात पोलीस उपायुक्त पदावरून लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली केली आहे. त्यामुळे आता विजयकुमार मगर हे लातूर येथे प्राचार्य म्हणून रुजू होणार आहेत.