
नांदेड – भोकर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत काँग्रेसकडून १२ इच्छूक उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये माजी सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनीही काँग्रेसकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. भोकर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात काँग्रेसला कोणतेही आव्हान नसल्याचेही रावणगावकर यांनी स्पष्ट केले.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे विजयी झाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, मुखेड या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे. माजी मुख्यमंत्री तथा भोकरचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर ते भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या आता प्रचाराला लागल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना कोण आव्हान देणार हा प्रश्न उपस्थित होत होता. काँग्रेसने राज्यभरातील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांचे अर्ज घेतले जात आहेत.
भोकर मतदारसंघात आतापर्यंत १२ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेत कृषी सभापती राहिलेल्या आणि २०१५ पासून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब रावणगावकर यांनी आज ८ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे रावणगावकर यांच्याकडे भोकरचे निरीक्षक पदही पक्षाने सोपवले आहे.
दरम्यान, उद्या ९ ऑगस्टपासून काँग्रेसची भोकर विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू होणार आहे. मतदारसंघातील ३२४ बुथपर्यंत काँग्रेसचे ध्येयधोरण या यात्रेच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे. या यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी अर्धापूर तालुक्यातील श्री सत्य गणपती मंदिर येथून खा. वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम राहतील. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इच्छूक उमेदवारही उपस्थित राहणार आहेत. विधानसभेसाठी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्यामागे ताकदीने सर्वजण उभे राहतील असा निर्धारही केला जाणार आहे.
…तर डी. पी. सावंतांना भोकरमध्ये प्रचाराला यावे लागेल काँग्रेसला जिल्ह्यात मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपात प्रवेश केलेले अनेकजण पुन्हा काँग्रेसमध्ये परत येत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू मानले जाणारे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचा दावा करत विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड उत्तर मतदारसंघात उमेदवारी मागितली आहे. याबाबत भोकरचे पक्ष निरीक्षक सभापती बाळासाहेब रावणगावकर म्हणाले, आता आगामी काळात काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत जाणार आहेच. परंतु माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत हे जिल्ह्याचे नेते आहेत. आगामी काळात त्यांना काँग्रेसच्या प्रचारासाठी भोकर मतदारसंघातही यावे लागणार आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे व्यावसायिक राजकारणी असल्याची टीकाही रावणगावकर यांनी केली. ज्या बडव्यांनी त्यांना राजकीय अडचणीत आणले, ज्यांना जनतेने नाकारले अशांना ते नेहमीच जवळ करतात. निवडणूक काळात भावनिक आवाहन करायचे अन् पुढे पाच वर्ष ढुंकूनही पाहायचे नाही हा त्यांच्या शिरस्ताच झाला आहे. यावेळी मात्र जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहील, असा विश्वासही रावणगावकर यांनी यावेळी व्यक्त केला.