
नांदेड – आगामी काळातील सण, उत्सव पाहता नांदेड जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांमध्ये असलेली समन्वयाची साखळी तोडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने आता अट्टल गुन्हेगारांच्या विलगीकरणाचा मार्ग निवडला आहे. नांदेडमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेल्या अट्टल गुन्हेगारांना आता एकाच तुरुंगात न ठेवता त्यांना राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात पाठविण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील कुख्यात टोळी प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांना सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील इतर विविध मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करून सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत माजविणाऱ्या टोळ्यांमध्ये अंतर्गत वादातून हिंसक घटना घडविणे, जबरी खंडणी, सुपारी घेऊन खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. रोहन निलाभ यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोका अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार नांदेड जिल्हा कारागृहात एकत्र असल्याने गुन्हेगारांचे एकत्रीकरण झाले होते. गुन्हेगारांच्या परस्पर संबंधामुळे कारागृहातील अंतर्गत सुरक्षितता प्रशासकीय कारणे तसेच शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्याचवेळी आगामी कालावधीतील सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्फत महासंचालनालयाकडे विशेष प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला अनुसरून गृह विभाग कारागृह व सुधार सेवा महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आणि न्यायालयाच्या परवानगीने कैलाश जगदीश बिगानिया, अनिल उर्फ पंजाबी सुरेश पवार, साईसिंह उर्फ लाला दीपकसिंह गहेरवार, ईश्वरसिंग जयवंतसिंग गिरणीवाले, सुरेंद्रसिंग उर्फ सुरज जगतसिंग गाडीवाले, आशु पाटील उर्फ कमलेश बालाजी लिंबापुरे आणि मिर्झा शब्बरबेग मिर्झा गफार बेग या सराईत गुन्हेगारांचे विविध कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारांचे हे विलगीकरण शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे पोलीस पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले. नांदेड जिल्हा व शहर परिसरामध्ये गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या अथवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी टोळ्यांची गय केली जाणार नाही. शहरात शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी सर्व पोलीस प्रशासन सर्व कठोर कायदेशीर उपाययोजना सातत्याने करीत राहिल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना आळा बसण्यासोबतच तुरुंगातून गुन्हेगारी कारवायांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्नही हाणून पाडला जाणार आहे. जिल्हा पोलीस दलाच्या या कारवाईकडे गुन्हेगारी टोळ्यांची साखळी तोडण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.



