
गोदावरी नदीत आजघडीला अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्णा, दुधना, येलदरी, सिद्धेश्वर या धरणातील पाणीही सोडण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा, पुंडलिका नद्यांसह इतर उपनद्याही गोदावरी नदीला मिळतात. या नद्यांनाही मोठा पूर आला आहे. गेल्या पंचवीस वर्षात विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आले आहेत २००६ मध्ये आलेल्या महापुरातही प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आता संपूर्ण मराठवाड्यासह नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा सर्व विसर्ग गोदावरी नदीत होत आहे. गोदावरीच्या माध्यमातून पुढे पोचमपाडमार्गे तो समुद्रात विलीन होतो. मराठवाड्यात पहिल्यांदाच संपूर्ण धरणे ओसंडून वाहत असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
विष्णूपुरी प्रकल्पाच्या गेट क्रमांक १ ची दुरुस्ती…विष्णूपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू असताना विसर्गही वाढविणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पाचा क्रमांक एकचा दरवाजा तांत्रिक दृष्ट्या बिघडल्याने या दरवाजाची दुरुस्ती जलसंपदा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर मंगळवारी रात्री सुरू केली होती. कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत यांच्यासह उपअभियंता नवनाथ पिसोटे, शाखा अभियंता सागर कदम, शिवम ससाने, कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, अरुण अंकुलवार, कनिष्ठ अभियंता बागवान आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात होते. यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता जी.एम घंटावार आणि अधीक्षक अभियंता प्रशांत देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूपुरी प्रकल्पाच्या क्रमांक एकच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.
विष्णूपुरी प्रकल्पाच्या गेट क्रमांक १ ची दुरुस्ती…


