
नांदेड- महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषदेच्या सर्व १७ जागा भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसची महायुती जिंकणार आहे, असा विश्वास व्यक्त करत, या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीची आन-बाण-शान काय आहे, हे आपण नांदेडमधून दाखवून द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी (दि. १ जून) आयोजित पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. डाॅ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. ॲड. श्रीजयाताई चव्हाण, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, सभागृह नेते महेश कनकदंडे, स्थायी समिती सभापती स.विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, राष्ट्रवादीचे नेते कैलास गोरठेकर, शिवसेनेचे आमदार बाबुराव कोहळीकर यांचे चिरंजीव शिवराज कदम कोहळीकर, आमदार बालाजी कल्याणकर यांचे पुत्र नगरसेवक सुहास बालाजीराव कल्याणकर आदी वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषदेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अमरनाथ राजूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राजूरकर यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या बैठकीनंतर अत्यंत उत्साही वातावरणात अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करताना महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबतच नगराध्यक्ष भगवान दंडवे, शंकर बोलमवार, संतोष कुलकर्णी, तुलजेश यादव, संदीप गाडीवाले, योगेश मुंढे, राजेश्वर देशमुख, मोईज, विश्रांती कदम, शकुंतला मुदीराज आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी अमरनाथ राजूरकर यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, राजूरकर यांची केवळ पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबतच नाही तर नगरपालिकेतील सर्व सदस्यांशी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांची थेट नाळ जोडलेली आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि स्थानिक पातळीवरील अडचणींवर कशा प्रकारे मात करायची, याचे उत्तम कौशल्य राजूरकर यांच्याकडे आहे. त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काचा आणि अनुभवाचा फायदा पक्षाला नक्की होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजूरकर यांच्याकडे असलेल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर ही निवडणूक आपल्याला एकतर्फी जिंकायची आहे, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राजूरकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावयाचे असल्याचेही खा. चव्हाण यांनी सांगितले आहे.



