राजकीय

नांदेडमध्ये भाजपाच्या जुन्या बूथ प्रमुखांना डच्चू..?

महापालिका मतदानाच्या एक दिवस आधीच घेतला निर्णय, जुन्या ६५० पैकी बहुतांश प्रमुखांना जबाबदारी पार पाडण्यापासून रोखले 

नांदेड – नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाला अवघा एक दिवस उरला असताना भारतीय जनता पक्षाच्या जुन्या बूथपमुखांना जबाबदारी पार पाडण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यांना आता तुम्ही बूथ वर थांबू नका दुसरे थांबतील असे सांगण्यात आले आहे. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात अनेक बूथ प्रमुखांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी केल्या आहेत. आता या तक्रारीची कितपत दखल घेतली जाईल, याकडेही लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पक्षात बूथ प्रमुख हा महत्त्वाचा घटक मानला जातो. बूथप्रमुखांना एकजूट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतो. बूथ प्रमुखांसाठी वेगवेगळे प्रशिक्षणही आयोजित करण्यात येत असतात. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीसाठी या बूथ प्रमुखांना प्रारंभापासून सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. त्या पार पाडत असताना आता मतदानास अवघा एक दिवस उरला असताना अचानकपणे जुन्या बहुतांश बूथपमुखांना बूथवर जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बूथपमुखांच्या जागी इतर कार्यकर्ते जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात जुने आणि नवे असा वाद पुढे आला आहे. त्याचवेळी जुन्या बूथ प्रमुखांवर विश्वास नाही का? असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. प्रामुख्याने महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ,नऊ आणि दहा तसेच इतर सर्व प्रभागातही अशीच रणनीती भाजपाने आखली आहे. त्याचवेळी शहरातील अन्य प्रभागातही जुन्या बूथ प्रमुखांना हटवून त्यांना आता कार्यमुक्त केल्याचेच स्पष्ट होत आहे. आता या बुथवर नवे कार्यकर्ते जबाबदारी पार पाडणार आहेत. विशेष म्हणजे या निर्णयाबाबत मंडळ अध्यक्षांनाही कोणतीही माहिती पक्षाकडून देण्यात आली नाही. एकूणच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी एक एक मत मिळवण्यासाठी धडपड करणारे बूथ प्रमुख आता बाजूला सारण्यात आले आहेत.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पक्षाकडून पहिल्यांदाच भाजपावर महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिका स्थापनेनंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर या महापालिकेत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तशी तयारीही भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे; मात्र असे असतानाच भाजपात पुन्हा एकदा जुने आणि नवे असा वाद पुढे आला आहे. महापालिका निवडणुकीत मतदानाच्या एक दिवसापूर्वीच घेतलेला हा निर्णय भारतीय जनता पक्षासाठी किती अनुकूल आणि किती प्रतिकूल ठरेल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षात बुथप्रमुख हा महत्त्वाचा घटक आहे. या बूथप्रमुखावरच मोठी जबाबदारी असते; मात्र त्याच बूथप्रमुखांना आता भाजपाच्या नव्या नेतृत्वाकडून डच्चू देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळला आहे. अनेक बूथ प्रमुखांनी भारताचे मराठवाडा संघटन प्रमुख संजय कौडगे यांच्यासह पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांकडेही या निर्णयाबाबत तक्रारी केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!