क्राईम

नांदेडमध्ये जिल्हा परिषद शिक्षकाने दोन मुलांसह पुलावरून गोदावरी नदीत टाकली कार..!

शिक्षकासह दोन मुलांचाही मृत्यू, हिमायतनगर गटशिक्षणाधिकाऱ्याकडून छळ केला जात असल्याचे ठेवले व्हाट्सअप स्टेटस..! नांदेडजवळील आमदुरा नदीवरील घटना 

नांदेड – गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळास कंटाळून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याची गंभीर घटना शुक्रवारी सकाळी घडली. या शिक्षकांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवून हिमायतनगरच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यात पोटा बु. येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले सुनील नारायण मोरे हे आज शुक्रवारी सकाळी नांदेडमधून निघाले. त्यांनी सारा नामक मुलगी आणि सुमित या आपल्या दोन्ही मुलांना गाडीमध्ये घेतले. मुलांना ट्युशनला सोडतो असे सांगून ते घराबाहेर पडले होते. ही गाडी मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे गोदावरी नदीवर आली असताना त्यांनी आपली कार सरळ नदीमध्ये टाकली. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी एसडीआरएफलाही पाचारण करण्यात आले. एचडीआरएफच्या जवानांनी मृतदेह आणि गाडी बाहेर काढली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळावर इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्यासह मुदखेड ठाण्याचे पोलीस अधिकारीही पोहोचले होते. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे घटनेबाबत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता हे दोन्ही अधिकारी एका बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. सुनील मोरे यांनी व्हॉट्स अप स्टेट्स ठेऊन गटशिक्षणाधिकारी छळ करीत असल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!