क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांनी केला डीजेवरील कारवाईचा श्रीगणेशा..! 

पुणेगावात डीजे वाजविण्याची तयारी करणाऱ्या डीजे चालकासह डीजे बोलावणाऱ्याविरुद्धही केला गुन्हा दाखल, कारवाईदरम्यान ६ लाख ६० हजारांचा मुद्देमालही केला जप्त 

नांदेड – नांदेडमध्ये डीजे बंदीचे आदेश असतानाही शुक्रवारी होणाऱ्या श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथे डीजे लावण्याची तयारी सुरू असताना नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळीच डीजे जप्त केला आहे. या प्रकरणात डीजे चालकासह डीजे बोलावणाऱ्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता डीजे वाजविण्याच्या तयारीत असलेल्यांना एक दिवस आधीच नांदेड जिल्हा पोलीस दलाने नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईच्या माध्यमातून एक कडक इशारा दिला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पुणेगाव येथे गुरुवारी सकाळी बसस्थानकासमोर एमएच २६ एडी ६६७३ क्रमांकाच्या पिकअप वाहनावर राज शिवसाऊंड नावाचा डीजे बसवून मोठमोठ्या आवाजात डीजे वाजवून आवाजाची चाचणी घेतली जात होती. यावेळी गस्तीवर असलेले नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोकॉ सुधाकर कदम व सहकाऱ्यांनी डीजे चालकाकडे विचारणा केली. त्यावेळी लोहा तालुक्यातील टेळकी येथील प्रेम गंगाधर कांबळे हा डीजे चालक असल्याचे समजले. प्रेम कांबळेची चौकशी केली असता सदरचा डीजे पुणेगाव येथील कार्तिक पुयड याने बोलावला असल्याची माहिती दिली. प्रेम कांबळे आणि कार्तिक पुयड हे दोघेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करताना आढळून आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात ७ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत डीजे बंदीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात प्रेम कांबळे आणि कार्तिक पुयड या दोघाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी सुधाकर कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईत ४० हजार रुपये किमतीचे दोन बेस, ८० हजार रुपये किमतीचे दोन टॉप, ४० हजार रुपये किमतीचे एक मिक्सर आणि पिकअप वाहन जप्त केले आहे. एकूण ६ लाख ६) हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी होत असलेल्या श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून डीजे वाजविणाऱ्यांसाठी एक कडक संदेश देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत डीजे बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत डीजे बंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी व्यक्त केला.

हे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!