
नांदेड : कंधार तालुक्यातील सोमठाणा येथे ई-पिक पाहणी प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने पीक पाहणीची नोंद करून फोटो अपलोड केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ई-पिक पाहणी सहाय्यक विजय गीते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीक पाहणीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने आपले कर्तव्य पार पाडावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत
ई-पिक पाहणी प्रक्रियेअंतर्गत प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहणी करून त्याची छायाचित्रे व आवश्यक माहिती प्रणालीवर अपलोड करणे अपेक्षित आहे. सोमठाणा येथे संबंधित ई-पिक पाहणी सहाय्यकाने पीआयपी (फोटोवरून फोटो काढून) ई-पिक पाहणीसाठी छायाचित्रे अपलोड केल्याचे तपासणीत आढळून आले.
या प्रकाराची तपासणी करण्यात आल्यानंतर ई-पिक पाहणीची नोंद चुकीच्या पद्धतीने करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कंधार तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यामार्फत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.
ई-पिक पाहणी प्रक्रियेत अनियमितता अथवा चुकीच्या पद्धतीने नोंदी करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



