
नांदेड : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विमानाने बुधवारी सकाळी १०.२५ वाजता आगमन झाले.
उदगीर येथील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचे लाभ वाटप कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवारी सकाळी नांदेडमध्ये आगमन झाले. त्यावेळी नांदेड विमानतळावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती.विमानतळावरुन राष्ट्रपती मूर्मु यांनी उदगीर येथील नियोजित कार्यक्रमासाठी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने प्रयाण केले.