
नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून रुजू होण्याचा शहाजी उमाप यांचा मार्ग मोकळा झाला असून राज्य शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना राज्य शासनाने नियुक्तीसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी पिंपरी चिंचवडचा पर्याय त्यांनी निवडला आहे. त्यांच्या बदलीच्या आदेशानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस उपमहानिरीक्षक पदी उमाप हे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात रुजू होऊ शकणार आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे नवे उपमहानिरीक्षक म्हणून बृहन्मुंबईच्या विशेष शाखेचे अपर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची पदोन्नतीने ९ जुलै रोजी राज्य शासनाने नियुक्ती केली होती. विद्यमान पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची पुणे येथे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र महावरकर यांनी आपली बदली विहित कार्यकाळापेक्षा आधीच झाल्याने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. यावर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने ११ जुलै रोजी सुनावणी घेताना उमाप यांनी नव्या आदेशापर्यंत रुजू होऊ नये, असे स्पष्ट केले होते.
याप्रकरणी १९ जुलै रोजी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे सुनावणी झाली. महावरकर यांच्यापुढे राज्याच्या गृह विभागाने नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबई येथील सह आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाचे पर्याय ठेवले होते. ऑनलाईन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत डॉ. महावरकर यांनी सहआयुक्त पिंपरी चिंचवड या पदाचा पर्याय स्वीकारला. त्यानंतर आता नांदेडमध्ये उमाप यांना रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे महानिरीक्षक पद मंजूर आहे ते पद अवनत करून पोलीस उपमहानिरीक्षक पदी शहाजी उमाप यांची बदली पदोन्नतीने नांदेडला करण्यात आली आहे. यापूर्वीही हे पद अवनत करण्यात आले होते. तत्कालीन उप महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, निसार तांबोळी यांना पद अवनत करून नांदेडमध्ये नियुक्ती दिली होती. आता उमाप हे नांदेडचे नवे पोलीस उप महानरीक्षक म्हणून लवकरच पदभार सांभाळणार आहेत हे निश्चित..
२९ जुलैपूर्वीही संपू शकतो नियुक्तीचा विषय…केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर झालेल्या या सुनावणीनंतर आता राज्य शासनाकडून डॉ. महावरकर यांच्या बदलीचे आदेश दिले जातील. महावरकर नांदेड पोलीस परिक्षेत्रातून कार्यमुक्त झाल्यानंतर शहाजी उमाप नांदेडमध्ये रुजू होतील, असे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय न्यायाधिकरणापुढे २९ जुलै रोजी या प्रकरणावर आणखी एक सुनावणी होणार आहे. या सुनावणीपर्यंत अथवा त्यापूर्वीही बदलीची ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले. डॉ. महावरकर यांच्या वकिलांकडून किंवा राज्य शासनाकडून या बदली संदर्भाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे या प्रकरणाची माहिती दिली जाईल. त्यानंतर हा विषय न्यायाधीकरण समाप्त करू शकते.