राजकीय

बेटमोगरेकरांच्या जि.प. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा इफेक्ट आठ वर्षानंतरही कायम..!

वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाढदिवसाच्या माध्यमातून साखर पेरणी

नांदेड – नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आठ वर्षापूर्वी धुरा हाती घेतल्यानंतर पुढील अडीच वर्षात जिल्हा परिषदेसह जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणात एकच नाव पुढे आले होते. ते नाव म्हणजे दिलीप पाटील बेटमोगरेकर… त्या अडीच वर्षातील झंझावती कारकिर्दीचा इफेक्ट आज आठ वर्षानंतरही कायम असल्याचे ८ जुलै रोजी पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नांदेडमधील निवासस्थानी सकाळी सात वाजेपासून रात्री उशिरापर्यंत त्यांच्या चाहत्यांची झालेली गर्दी लक्षात घेता त्यांची राजकीय क्रेझ अद्यापही कायमच असल्याचे दिसून आले आहे. त्यातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीनेही राजकीय मंडळीचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी काळात २०१२ ते २०१७ च्या कालावधीतील जिल्हा परिषदेची टीम पुन्हा एकदा एकत्र येऊन नव्या राजकीय गणितांची मांडणी करीत आहे की काय याकडेही आता लक्ष लागले आहे.

नांदेड जिल्हा परिषदेला गंगाधरराव कुंटूरकर, बाबासाहेब गोरठेकर, बापूसाहेब गोरठेकर, गोविंदराव धर्माधिकारी, कमलकिशोर कदम, हरिहरराव भोसीकर, गोविंद राठोड, प्रतापराव पाटील चिखलीकर अशा मोठ्या राजकारण्यांची परंपरा आहे. या राजकारण्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदापासून सभापती पदावर काम केले आहे. हे काम करताना मिनी मंत्रालयातून थेट मंत्री पदापर्यंत पोहोचलेले राजकारणीही नांदेड जिल्ह्यात आहेत. त्यात २३ मार्च २०१२ रोजी नांदेड जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील बेटमोगरेकर यांची निवड झाली.  या निवडीनंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून गेला. संपूर्ण जिल्ह्यात अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा एक नवा झंझावात जिल्ह्यात  सुरू झाला. बेटमोगरेकर यांनी आपल्या कार्यकाळात गाव पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत आपल्या पदाची छाप सोडली. गाव पातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते राज्य सचिवांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या एकूणच कार्यशैलीची भुरळ पडली होती. यातूनच राज्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने त्यांचा डायनामिक अध्यक्ष असा उल्लेख केला होता. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणातही मुरब्बी अशा विरोधकांना बेटमोगरेकर यांनी आपल्या कार्यकाळात हालचाली करू दिल्या नव्हत्या. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच त्यांची रणनीती ठरलेली असायची. विरोधकांच्या प्रश्नांना कसे टोलवायचे याची ते रंगीत तालीमच सभेपूर्वी घ्यायचे. या तालमीतील सदस्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येत शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे सर्व सदस्य आजघडीला वेगवेगळ्या पक्षात असले तरीही त्यांनी आपल्या तत्कालीन अध्यक्षाला दिलेल्या शुभेच्छा या राजकीयदृष्ट्या प्रगल्भ अशाच आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच राजकीय हालचालींनाही आता वेग आला आहे. या काळातच नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा आज मंगळवारी झालेला वाढदिवस आगामी जिल्हा परिषद निवडणुकांची साखर पेरणी करणाराच ठरला आहे. मुखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर जिल्हा बेटमोगरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी पोहोचले. यामध्ये खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्यासह  वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तसेच संघटनांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. सकाळी सात वाजेपासून सुरू झालेला हा शुभेच्छांचा वर्षाव रात्री उशिरापर्यंत सुरूच होता यात. नांदेड जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. येणारा प्रत्येकजण त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झालेल्या कार्याला उजाळा देत होता. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एखादे काम नियमात कसे बसवायचे याबाबत अधिकाऱ्यांना बेटमोगरेकर कसे निर्देश द्यायचे याची माहिती देत होते.

जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आगामी काळातील राजकीय रणनीतीही आता या वाढदिवसाच्या माध्यमातून आखली गेली असल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी या ना त्या माध्यमातून बेटमोगरेकर यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. हा संपर्क पक्षीय भेदाच्या पलीकडे कायम आहे. नुकताच या सहकाऱ्यांना घेऊन झालेला गुवाहाटी दौराही चर्चेचा ठरला होता. आता वाढदिवसानिमित्ताने झालेली साखर पेरणी ही आगामी राजकीय दिशा स्पष्ट करीत असल्याचेच दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!