
नांदेड – भोकर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने ॲड. श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीच्या माध्यमातून श्रीजया यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची चांगली सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्यासह मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापुढे ॲड. श्रीजया चव्हाण यांच्या पाठीशीही भोकर मतदारसंघातील जनमताचा कौल राहील, असा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाने ॲड. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी रविवारी नांदेडमध्ये भाजपा पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. ही उमेदवारी श्रीजयाच्या सामाजिक व राजकीय कार्याची चांगली सुरुवात आहे. त्यात ॲड. श्रीजया चव्हाण यांना निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नांदेडमधील चार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाने घोषित केले आहेत. त्यात भोकर मतदारसंघाचाही समावेश आहे. लोहा आणि देगलूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित झाला नाही. या ठिकाणी अद्याप जागावाटप तसेच इतर काही मुद्दे असतील, ते सुटले नसतील असे चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आपण प्रारंभीपासून प्रयत्न केले आहेत. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी ही झाली आहे. हे आरक्षण न्यायालयातही टिकले आहे. त्यामुळे हा निर्णय जनतेपर्यंत आपण पोहोचविला आहे. वारंवार मराठा तरुणांना या निर्णयाबाबत माहिती दिली जात आहे. अनेक तरुणांना, समाज बांधवांना ही भूमिका पटली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काम करणाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे त्यामुळे त्यांची भूमिका महाराष्ट्र हिताची राहील असेही ते म्हणाले.
नांदेड लोकसभेचा उमेदवाराबाबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव तसेच पक्षातील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी पण सहभागी होतो. परंतु नांदेड लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पातळीवर आणखी चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा. चव्हाण यांनी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. माझी मुलगी आता भोकर विधानसभा मतदारसंघात उमेदवार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणे शक्य नाही. मी पक्षाकडे उमेदवारीची मागणीही केली नाही. त्यामुळे माझ्या उमेदवारीचा प्रश्नच नाही. दुसरीकडे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हेही लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा पक्षपातळीवरच विचार होईल. योग्य तो निर्णय घेतला जाईल.
खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. तर आता भाजपाचा लोकसभेचा उमेदवार कोण राहील याबाबत विचारले असता भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची कमी नाही. त्यामध्ये मारोतराव कवळे यांच्यासह राम पाटील रातोळीकर, संतुक हंबर्डे, राजेश कुंटूरकर आदींच्या नावांचा खा. चव्हाण यांनी उल्लेख केला. यावेळी माजी आमदार अमरनाथ राजुरकर, भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.
भोकरमध्ये चव्हाण कुटुंबीयांची पन्नास वर्षे जनसेवा..- ॲड. श्रीजया चव्हाण …भोकर विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ॲड. श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघात काम करताना जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले. या मतदारसंघात चव्हाण कुटुंबियांनी ५० वर्ष जनतेची सेवा केली आहे. यापुढेही अशीच सेवा करून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्या प्रयत्नात आपण नक्की यशस्वी होऊ. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांनी येथे काम केले आहे. खा. चव्हाण यांचे नेहमीच मला मार्गदर्शन राहते, काही अडचणी आल्याचं तर ते आहेतच अशी टिप्पणीही त्यांनी केली. ही निवडणूक लढवताना उत्साह तर आहेच पण त्यासोबतच सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर पडणार आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सदैव प्रयत्न करू असेही त्यांनी स्पष्ट केले.