नांदेड – नवीन नांदेडातील कौठा भागात चोरट्यांनी सरस्वतीनगर येथे घरी कोणी नसल्याची संधी साधत एका व्यापाराचे घर फोडून रोख अडीच लाखांसह १३ तोळे सोन्यावर डल्ला मारला. ही घटना रविवारी पहाटे साडेचार च्या सुमारास घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीनगर येथील मामीडवार हे व्यापारी आहेत. १६ नोव्हेंबरच्या रात्री ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरामध्ये असलेले रोख अडीच लाख आणि १३ तोळे सोने चोरट्याने लंपास केले आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यात दोन चोरटे दुचाकीवर आले होते. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून घरात प्रवेश केला होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच घटनास्थळावरील इतर माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह इतर पोलीस कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेतला जाईल, असे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सांगितले.