राजकीय

नांदेडमध्ये नवा राजकीय इतिहास घडणार..!

मतांच्या विभाजनात नांदेड उत्तरमध्ये अब्दुल सत्तार तर नांदेड दक्षिणमध्ये फारूक अहमद यांना विजयाची संधी

नांदेड – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाचे आराखडे तयार करत असला तरी नांदेडमध्ये इतिहास घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार आणि नांदेड दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद यांना विजयाची संधी निर्माण झाली आहे. ही संधी कायम राखण्यासाठी मतदानाच्या आधी दोन दिवसात घडणाऱ्या घडामोडी निश्चितच महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्याचवेळी नांदेड मात्र आता नवा राजकीय इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र आजघडीला तरी निर्माण झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नऊ विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात यावेळी काँग्रेसला प्रथमच सात विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने संधी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला किनवट विधानसभा मतदारसंघ तर लोह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपाला सर्वाधिक पाच, शिवसेना तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आली आहे.
यामध्ये नांदेड शहरातील दोन्ही  त्यातही उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरादरम्यान शिवसेना फुटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात पुढे गुवाहाटीला गेलेले नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संगीता डक यांनी आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचेच आहेत दुसरीकडे भाजपाचे बंडखोर उमेदवार मिलिंद देशमुख यांनीही या निवडणुकीत चांगलाच जोर लावला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांनी नांदेड उत्तरमध्ये प्रचारामध्ये शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतांचे विभाजन कसे होते आणि त्यातून कोणाला फायदा होतो, याकडेही लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  कल्याणकर यांच्या विजयासाठी नव्हे तर परायजयासाठीच अनेक अदृश्य शक्ती जोमाने कामाला लागल्याचे लक्षात घेता ही निवडणूक कल्याणकर यांना निश्चितपणे जड जाणारी ठरत आहे. त्यात मत विभाजनाचीही चिंता कल्याणकर यांना लागली आहेच. दुसरीकडे अब्दुल सत्तार यांना मिळालेला मुस्लिम समाजाचा पाठिंबा हा त्यांचा मोठा प्लस पॉईंट आहे. तब्बल ४० वर्षानंतर नांदेडमध्ये मुस्लिम समाजाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला कितपत यश मिळते हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
नांदेड दक्षिणचे चित्रही मतांच्या फाटाफुटीवरच अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांना हो नाही करत काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिली खरी, मात्र त्यांच्यासमोर आता विजयाचे आव्हान उभे राहिले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंधरा ते वीस दिवसात आमदार झालेल्या मोहन हंबर्डे यांच्या पाठीशी आता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची ताकद नाही, सूक्ष्म नियोजनही नाही. ही बाब हंबर्डेही जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवताना आपल्या सग्या सोयऱ्यावरच भर दिला आहे. ज्या मुस्लिम मतांच्या आधारावर काँग्रेसचे उमेदवार सातत्याने विजयी झाले ती मते यंदा किती मिळतील याचीच चिंता हंबर्डे यांना लागली आहे.  त्यांच्यापुढे शिवसेनेचे आनंद बोंढारकर यांचे आव्हान आहे. आनंद बोंढारकर हे नवखे असले तरी ते महायुतीचे उमेदवार आहेत. नांदेड दक्षिण मतदार संघात विजयी उमेदवाराच्या विजयात जुन्या नांदेडसह नवीन नांदेडचा मोठा वाटा राहणार आहे. नवीन नांदेडमध्ये सिडको, हडको, बळीरामपूर, वसरणी, असर्जन, कौठा तसेच लोहा तालुक्यातील काही गावांचाही समावेश होतो.  सिडको हडकोमध्ये भाजपाचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार संजय घोगरे यांनी मोठी ताकद लावली आहे. नवीन नांदेडसह ग्रामीण भागातही त्यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवताना आपली ताकद दर्शविली आहे.  नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपाचे दुसरे बंडखोर अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते मोठी लढाई लढत आहेत. सलग दोन वेळा पराभूत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली उमेदवारी दाखल केली आहे. यात दोन वेळा त्यांनी बंडखोरी केली आहे. सातत्याने ते दुसऱ्या क्रमांकावर राहत असल्याने त्यांना यावेळी विजयाची संधी वाटत आहे. त्यांच्या पाठीशी भाजपा व इतर पक्षाचे किती अदृश्य हात उभे आहेत यावरही विजयाचे गणित ठरणार आहे. त्यांनी प्रचारातही मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नवा इतिहास घडविण्याच्या तयारीत असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहमद यांनाही आता विजयाच्या ‘लक्ष्या’पर्यंत जाण्यासाठी मतदानाच्या आधीचे शेवटचे दोन दिवस मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मतदानाच्या शेवटच्या दोन दिवसात घडणाऱ्या घडामोडी या निश्चितपणे निर्णायक ठरणार आहेत. ही बाब सर्वच उमेदवार जाणून आहेत. त्यामुळे या शेवटच्या दोन दिवसात रिंगणातील उमेदवार किती सजग राहतील यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहेच. नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांच्यासह नांदेड दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद यांना मुस्लिम समाजाने पाठिंबा घोषित केला आहे. हा पाठिंबा दोन्ही उमेदवाराच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलणार आहे. कारण नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मते निर्णय ठरणारी आहेत हे वास्तव आहे. त्यामुळे या दोन्हीही उमेदवारांना आता इतिहास घडविण्याची संधी उपलब्ध निर्माण झाली आहे. नांदेड दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीला दलित मतांचा आधार मिळाला तर निश्चितच फारुख अहमद यांचा विजयाला गवसणी घालण्याचा निर्धार साध्य होणार आहे. प्रचारामध्ये फारुख अहमद यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता मतांचा हा आधार निश्चितपणे मिळेल, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. फारुख अहमद यांनीही हे सामाजिक समीकरण जुळवूनच निवडणुकीची तयारी पहिल्या टप्प्यापासूनच केली आहे. त्यात आता त्यांना शेवटच्या टप्प्यात यश मिळत असल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेडमध्ये सभाही होत आहे. या सभेचाही निश्चित लाभ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!