क्राईम

नांदेड पोलीस परिक्षेत्रात निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मासरेड’, २२ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त 

नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी कारवाई, १७३ जणांविरुद्ध १६९ गुन्हे दाखल

नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रात हातभट्टी निर्मूलनासाठी रविवारी १० नोव्हेंबर रोजी नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात एकाच वेळी ‘ मासरेड ‘ करण्यात आली. या कारवाईत २२ लाख ५९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग येत असतानाच पोलिसांच्या कारवाईलाही वेग आला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकाच दिवशी १६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू आणि रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात एकाच वेळी मासरेड करण्यात आली. परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यात राबवलेल्या या मोहिमेत २२ लाख ५९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू, सिंदी आदी साहित्याचा समावेश आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा या कारवाईत सहभाग होता. या कारवाईमध्ये नांदेड जिल्ह्यातील ६० अधिकारी आणि २५५ अंमलदारांचा सहभाग होता. त्यासोबतच परभणी जिल्ह्यातील ६२ अधिकारी आणि १२६ अंमलदार, हिंगोली जिल्ह्यातील ४० अधिकारी आणि १२२ अंमलदार तर लातूर जिल्ह्यातील ३० अधिकारी आणि १४४ अंमलदारांनी सहभाग घेतला. या कारवाईत एकूण १९२ अधिकाऱ्यांसह ६४७ अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
एकाच दिवशी केलेल्या या मासरेडमध्ये सर्वाधिक मुद्देमाल लातूर जिल्ह्यात जप्त केला आहे. येथे ७ लाख ८४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ६ लाख १७ हजार ६९० रुपये, परभणी ४ लाख ८१ हजार ५८० रुपये आणि हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ९ हजार २१६ लिटर हातभट्टीची दारू,  ३८ हजार १५२ लिटर दारूचे रसायन, ३४६ देशी दारूच्या बाटल्या, ५४ बाटल्या विदेशी दारू आणि २०० लिटर सिंदीचा समावेश आहे.
या चारही जिल्ह्यात १६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी तसेच पोलिसांच्या या अवैध दारू हातभट्टी निर्मूलनासाठी हातभार लावावा असे आवाहन, नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

१७३ जणांविरुद्ध १६९ गुन्हे दाखल… नांदेड पोलीस परिक्षेत्रात केलेल्या या मासरेडमध्ये १६९ गुन्हे दाखल करण्यात आले असून सहभागी आरोपींची संख्या १७३ इतकी आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात ३५ गुन्हे दाखल केले असून आरोपींची संख्या ३७ आहे. परभणी जिल्ह्यात ४३ गुन्ह्यांमध्ये ४३ आरोपी, हिंगोलीत २४ गुन्ह्यांमध्ये २६ आरोपी आणि लातूरमध्ये ६७ गुन्ह्यांमध्ये ६७ आरोपी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग भरू लागला आहे. त्यात कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा करण्यात येत आहे. त्यात अवैधरित्या दारूची वाहतूक सुरू आहे. त्याला पोलिसांच्या या कारवाईने आळा घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!