
नांदेड : महाराष्ट्र शासनाचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त घर-घर संविधान रॅली आयोजित करण्यात आली. शेकडो नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचे केलेले सामूहिक वाचन लक्षवेधी ठरले.
नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपायुक्त संजय जाधव, सुप्रीया टवलारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक चंदा रावळकर, डी.वाय पतंगे, अशोक गोडबोले, माधव जमदाडे व भिमराव हटकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृति पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तद्नंतर गिरीष कदम, शिवानंद मिनगीरे यांनी हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात केली. सदर संविधान रॅली महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आली. येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येवून संविधान रॅलीची संगाता करण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून जिल्हयातील सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा व घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्य त्यांचे पालन करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नांदेड कार्यालयील अधिकारी कर्मचारी, जाती पडताळणी कार्यालयील अधिकारी कर्मचारी, जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद नांदेडचे अधिकारी कर्मचारी तसेच इतर मगासव बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नांदेड जिल्ह्यातील विविध, महामंडळचे व्यवस्थापक व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी, सामजिक कार्यकर्ते तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांची उपस्थिती होती. संविधान रॅलीमध्ये नांदेड जिल्हयातील एन.एस.बी महाविद्यालय नांदेड, सायन्स कॉलज नांदेड, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वसंतराव नाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सायन्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला. सदर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक ,कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे संविधान अमृत महोत्सव घर-घर संविधान रॅलीत सहभागी झाले होते.
महात्मा फुले प्राथमिक शाळेची लक्षवेधी रॅली…ज्ञान विकास संस्था कापसी ता. लोहा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी पंकजनगर धनेगाव येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेची लक्षवेधी रॅली ही महात्मा फुले पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे सचिव शुद्धोधन कापसीकर यांच्यासह मुख्याध्यापक सुधाकर पोवळे व शाळेतील इतर शिक्षकवृंदाने या रॅलीत सहभाग घेतला होता शाळेचे लेझीम पथकही लक्ष वेधून घेत होते. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून या रॅलीची सांगता करण्यात आली.