नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. मधील द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. दि. २६ नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी काही परीक्षा केंद्रावर अचानक भेटी दिल्या. यावेळी परीक्षा केंद्रांवरील सोयी-सुविधेबद्दल नाराजी व्यक्त करत उपस्थित कर्मचाऱ्यांना तुमच्या महाविद्यालयाचे संलग्निकरण का रद्द करण्यात येऊ नये? अशी तंबी दिली.
दि. २६ नोव्हेंबरपासून विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयामध्ये प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा चालू आहेत. यातील काही महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना कुलगुरू डॉ. चासकर यांनी भेट दिली. तेव्हा त्यांना अनियमितता आणि सोयी- सुविधांचा अभाव आढळला. यावर त्यांनी अतिशय नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार परीक्षा केंद्र घेणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असे आहे. परंतु कुलगुरू डॉ. चासकर यांच्या भेटीदरम्यान याबाबत अनियमितता दिसून आली.
यापुढे कोणत्याही संलग्नित महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर अनियमितता अथवा विद्यार्थ्यांची गैरसोय आढळून आल्यास अशा महाविद्यालयावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिला.
सीईओ मीनल करणवाल थेट मनरेगाच्या कामावर…
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी अचानक लोहा तालुक्यातील मस्की, देऊळगाव येथील मनरेगा कामावर भेट दिली व शेततळे सिंचन विहीर व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड आदी कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी मस्की येथील शेततळे व देऊळगाव येथील शिवनंदा नेमाजी सोनवळे यांच्या शेतातील सिंचन विहिरींची पहाणी केली. विहिरीत पाणीसाठा पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या सिंचन विहिरीच्या लाभार्थी शिवनंदा सोनवळे यांना बोलावून सिंचन विहिरीच्या योजनेचा लाभ घ्या, फळबाग लागवड करावी, अधिक उत्पन्न काढावे असे सांगत कापूस वेचणी व कापसाचे उत्पादन किंमत यावर चर्चा केली. त्यांनी रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या कामाची पाहणी केली. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड कामावर महिला, पुरुष झाडांना आळे व बाजूचे गवत काढणाऱ्या महिला मजुरांसोबत संवाद साधला.
चिकुनगुनिया प्रभावित पेडपल्लीस जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेट…देगलूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मरखेल अंतर्गत पेडपल्ली या गावात २३ नोव्हेंबर रोजी चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच पेडपल्ली या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन, तात्काळ प्रतिबंधात्मक व उपचारात्मक प्रभावी काम कसे करायचे, या बाबतीत आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांना आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच प्रतिबंधासाठी मरखेलचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. योगिता चामले, आरोग्य सहाय्यक डी. एल. कुलकर्णी, आरोग्य सेवक ए.एस. खांडरे, आरोग्य सेविका येदगिवार या वैद्यकीय पथकाद्वारे गावात रुग्णांवर उपचार केला जात आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस प्रजातींद्वारे पसरतो. हे डास जेव्हा विषाणूने आधीच संक्रमित व्यक्तीला चावतात तेव्हा ते संक्रमित होतात. विषाणू प्राप्त केल्यानंतर, डास त्यांच्या चाव्याव्दारे इतर मानवांमध्ये पसरवू शकतात. आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना केल्या जात असून, चिकुन गुनियाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घर परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. दर आठवड्यास शनिवारी कोरडा दिवस पाळावा. ग्रामपंचायतीने गावातील पाणी साचणारे खड्डे बुजवून घ्यावेत. तुंबलेली नाली व गटारी वाहत्या कराव्यात. चिकुन गुनियाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी केले.