
नांदेड – शहरातील बेशिस्त झालेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या दोन्ही विभागासह नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी ऑटो चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. या मोहिमेत पहिल्याच दिवशी १७३ ऑटोरिक्षावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ७६ हजार रुपये दंड भरून घेण्यात आला आहे. ४४ प्रकरणात २६ हजार ७०० रुपये दंड मागील प्रकरणातील वसूल करण्यात आला आहे. कागदपत्र अपूर्ण असल्याने नांदेड ग्रामीण ठाण्यात ७० ऑटोरिक्षा लावण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे अपूर्ण कागदपत्र असलेले तसेच हातावर पोट असलेले ऑटोचालक आता हैराण झाले आहेत.
नांदेड शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी नांदेड शहरातील ऑटोरिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्याबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने १८ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील ऑटोरिक्षाचे सर्व कागदपत्रे त्यामध्ये इंन्शुरन्स, वाहनाचे फिटनेस सर्टिफीकेट, ऑटोरिक्षाचे परमीट व ऑटोरिक्षा चालविण्याचा परवाना (लायसन्सं) तपासण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली. सदर मोहीमेमध्ये ऑटोरिक्षाचे परमीट संपलेले व इतर कागदपत्र तपासणी करुण अपूर्ण असल्याने कागपत्र व युनिफॉर्म परिधान न केलेले असे एकुण १३५ ऑटोरिक्षा चालकाविरुध्द केसेस करुन त्यांचे वर इ चालन द्वारे २ लाख ३९ हजार ५०० रुपये दंड लावण्यात आला आहे. तसेच मागील प्रलंबित असलेल्या ४४ केसेसचा एकूण २६ हजार ७०० रुपये दंड वाहनधारकाकडून वसुल करण्यात आला आहे. इतवारा शहर वाहतुक शाखेतर्फे ३८ वाहन धारकावर कारवाई करून ३६ हजार ५०० रुपये इ चालन द्वारे दंड लावण्यात आला आहे. पो.नि पो.स्टे. नांदेड ग्रामीण यांनी ऑटोरिक्षाचे कागदपत्र तपासणी दरम्यान ७० ऑटोरिक्षाचे कागदपत्र अपूर्ण असल्याने पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे लावण्यात आले आहेत.
सदर मोहीम पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थीतीत राबविण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने सदरची मोहीम सहा. पोलीस अधीक्षक नांदेड शहर किर्तीका सी एम व उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशीलकुमार नायक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या सदर मोहीममध्ये शहर वाहतुक शाखा इतवारा येथील जगन पवार, पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथील पो. नि. ओमकांत चिचोलकर, श.वा.शा. वजिराबाद येथील पो.नि. गुट्टे, पोउपनि कुलकर्णी, पो.उप.नि. कोटतीर्थवाले शहर वाहतुक शाखा, ट्राफीक अंमलदार असे हजर होते.
नांदेड शहरातील ऑटोरिक्षा चालक/मालक यांना कळविण्यात येते की, सदरची मोहीम ही यापुढे पण चालू राहणार आहे. सदरची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी ऑटोरिक्षा/मालक यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.