महापालिका

नांदेडमध्ये आज पहिल्यांदाच होणार वृक्ष पुनर्रोपणाचा प्रयोग

महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे काम, यशस्वीतेनंतर शहरातील इतर झाडांचेही पुनर्रोपण होणार

नांदेड – शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि रस्ता कामात अडसर ठरणाऱ्या मोठ्या वृक्षांचे इतरत्र पुनर्रोपण करण्यासाठी महापालिका आता प्रयत्न करत आहे. प्रायोगिक तत्त्वावर नांदेड शहरातील कलामंदिर रस्त्यावरील दोन झाडांचे आज १९ डिसेंबर रोजी रात्री डंकीन परिसरातील नवीन एसटीपी केंद्र परिसरात पुनर्रोपण केले जाणार आहे. या वृक्ष पुनर्रोपणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील इतर ठिकाणची मोठी झाडेही इतरत्र हलविण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक तसेच रस्ते विकासासाठी येणारा मोठा अडसर दूर होईल असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. हे रुंदीकरण करताना शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली झाडे तोडावी लागत आहेत. या वृक्षतोडीस अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे. हा विरोध समर्थनीय असला तरीही रस्ते विकासाचे कामही करावे लागणार आहेच. त्यामुळे त्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल असाच तोडगा काढणे आवश्यक होते. हा तोडगा काढताना पुणे मेट्रोच्या कामासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे करताना मोठी झाडे पुनर्रोपित करण्यात आली आहेत. हे काम करणाऱ्या ‘घोरपडे अँड असोसिएट’ ला नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले झाडे पुनर्रोपित करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाचारण करण्यात आले आहे.

नांदेड शहरातील कलामंदिर भागात असलेल्या मुख्य रस्त्यावरील एका मोठा पिंपळ वृक्ष आणि गुलमोहर झाडाचे पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया १९ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी गेल्या चार दिवसापासून केली जात आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली असून गुरुवारी रात्री ही दोन्ही झाडे मोठ्या क्रेनद्वारे काढून डंकीन परिसरातील नवीन एसटीपी सेंटरवर लावली जाणार आहेत. मोठ्या वृक्ष पुनर्रोपणाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील इतर ठिकाणचीही झाडे न तोडता त्यांचे पुनर्रोपण केले जाईल, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!