
नांदेड : महाविहार, बावरीनगर दाभड येथे होणाऱ्या ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी उभारण्यात येणार्या सभा मंडपाचे भूमिपूजन ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा शाखा महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड व नांदेड वासियांच्या संयुक्त विद्यमाने महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी लाखो उपासक उपासिका धम्म परिषदेत संमिलित होत दिवसरात्र धम्मदेसनेचे श्रवण करीत असतात. त्यांचे सोयीसाठी मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात येत असते.
याच नअनुषंगाने धम्म परिषदेनिमित्त उभारण्यात येणार्या सभा मंडपाचे भूमिपूजन ५ जानेवारी रोजी दु. ३ वाजता पू. भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या उपस्थितीत पू. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक बांधकाम विभाग नांदेडचे अधीक्षक अभियंता संभाजी धोंडीबा धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खू दयानंदजी महाथेरो, भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खू अश्वजीत थेरो, भिक्खू शीलरत्न थेरो, भिक्खू रेवतबोधी थेरो, भिक्खू बुद्धभूषण व पूजनीय भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास उपासक – उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनेने व धम्म कार्याने लाभान्वित व्हावे, असे आवाहन संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.