
नांदेड – नांदेडमध्ये आनंदनगर भागात १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेचा पोलीस तपास करत असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल परिसरात साईनाथ प्रकाश कोळेकर या १७ वर्षीय युवकाला दोघा तिघांनी जबर मारहाण करीत त्याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला साईनाथ हा युवक विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्याआधीच मरण पावला होता.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आनंदनगर मॉल येथे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेबाबत अधिक माहिती घेतली. घटनेची माहिती घेऊन त्यांनी विमानतळ पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेत एकापेक्षा अधिक मारेकरी असल्याची बाब पुढे आली आहे. मित्रातील वादामधूनच हा खुनाचा प्रकार घडल्याची बाब आहे स्पष्ट होत आहे. या वादाचे नेमके कारण मात्र अद्यापही पुढे आले नाही. या घटनेतील मारेकऱ्यांना लवकरच पकडले जाईल असे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले.