क्राईम

नांदेड गँगवॉरने हादरले, एकाच वेळी तिघांचा खून..!

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलेल्याही संपविले, साई लाला आणि सदा गँग आली समोरासमोर, पोलीस म्हणतात आमच्याकडून पूर्वीच झाली होती कठोर कारवाई

नांदेड – नांदेड शहरात काल मध्यरात्रीनंतर झालेल्या खुनी गँग वॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना एका मयताच्या भावाने चाकूने वार करून संपविले. नांदेडमधील साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळीयुद्ध झाले. दोन्ही गँगमधील मयत आणि साथीदार हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हद्दपारी, एमपीडीएअंतर्गतही गुन्हे दाखल आहेत. या गॅंगवॉरमुळे नांदेडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा अर्जितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन साथीदार भारत ई-स्क्वेअरमधून ‘ धुरंदर’ हा चित्रपट पाहून बुलेटवर निघाले होते. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या साई लाला गँगचे सदस्य महमद अरबाज, सय्यद आवेज आणि त्यांचे साथीदार दबा धरून होते. चित्रपट पाहून थोड्या अंतरावर अर्जितसिंघ आणि त्याचे सहकारी आले असता त्यांना गाठून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा अर्जितसिंघ आणि सहकाऱ्यांनी जोरदार प्रतिकार केला. यावेळी तलवार, चाकू आणि धारदार शस्त्रांचा वापर दोन्ही गँगमध्ये करण्यात आला. या हल्ल्यात सदा गँगचा अर्जितसिंह चव्हाण आणि साई लाला गँगचा महंमद अरबाज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आवेज आणि अन्य जखमीना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते.

तिकडे शासकीय रुग्णालयात अर्जितसिंघ चव्हाण याचा भाऊ आणि वडीलही आले होते. गंभीर जखमी महमंद आवेज याला रुग्णालयात दाखल करत असताना अर्जितसिंह चव्हाण याच्या भावाने आवेजवर चाकूने वार केले. यात आवेजचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणात मोठी धरपकड सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगीतले. या गँग वॉरच्या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.

दोन्ही टोळ्यांचे जबरदस्त गुन्हेगारी रेकॉर्ड..! शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या दोन गॅंगवॉरमध्ये एकाच वेळी तिघांचा खून झाला आहे. पोलीस दप्तरी या दोन्ही गँगच्या सदस्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मयत अर्जितसिंघविरुद्ध तब्बल नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचवेळी साई लाला गँगचा अनिल पंजाबी हा ‘एमपीडीए’मध्ये तुरुंगात आहे. अर्जितसिंघविरुद्धही हद्दपारी, एमपीडीएची कारवाई केली होती. साई लालाही नुकताच तुरुंगाबाहेर पडलेला आहे. एकूणच या प्रकरणातील दोन्ही गॅंगची क्रिमिनल हिस्ट्री जबरदस्त आहे. पोलीस दलाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असल्याचे नेहमीच सांगितले जाते. असे असताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतरचे हे खुनी गॅंगवॉर दुर्लक्षित राहिले का हा प्रश्नच आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!