
नांदेड – मानसिक तणावात असलेल्या २६ वर्षीय तरुणाने आपल्या आईची हत्या करून स्वतःही गळफास घेतल्याचा गंभीर प्रकार नांदेडमध्ये तरोडा भागातील राहुल कॉलनी येथे शनिवारी रात्री घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस आता अधिक तपास करीत आहेत.
नांदेड शहरातील तरोडा भागातील राहुल कॉलनी येथील बालाजी सोपान चौथरे हे भारतीय सैन्य दलात सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांची मुलगी प्राची चौथरे ही पुण्यामध्ये शिक्षणासाठी राहते. राहुल कॉलनीमधील घरी पत्नी भारती बालाजी चौथरे आणि मुलगा प्रतीक बालाजी चौथरे हे दोघे राहत होते. ८ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या घटनेत मुलगा प्रतिक चौथरे याने बॅट आणि रॉडने मारहाण करून भारती चौथरे यांचा खून केला. त्याचवेळी त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसिक तणावातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. प्रतिक चौथरे याच्यावर गेल्या काही दिवसापासून डॉक्टर जोशी यांच्याकडे मानसिक आजारावर उपचार सुरू होते, अशी माहितीही पुढे आली आहे. त्याचवेळी प्रतिक हा गेल्या पाच सहा वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच हा गंभीर प्रकार घडला. त्याने आपल्या जन्मदात्या आईवरच जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेतला. घटनेनंतर भाग्यनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
शनिवारी सायंकाळपासूनच राहुल कॉलनी येथील चौथरे यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता; मात्र शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या दुर्लक्षातूनच हा हृदयद्रावक प्रसंग घडला आहे. आईची मुलानेच बॅटने आणि रॉडने मारून निर्ग हत्या केली तर स्वतःही गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात मयत भारती चौथरे यांचे बंधू मधुकर सताजीराव झगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतिक चौथरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.



