अपघात

नांदेड महापालिकेत रस्ते विकासाचा आढावा तर दुसरीकडे रस्ता खचल्याने कार थेट १० फूट खड्ड्यात..!

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर 'रेड अलर्ट'च्या दिवशी महापौरांनी घेतली रस्ते विकासाची बैठक, अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय प्रवेशद्वाराजवळच रस्ता खचला, सुदैवाने प्राध्यापकाचे वाचले प्राण 

नांदेड – पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत असताना आणि हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिल्यानंतर जाग आलेल्या नांदेडच्या महापौर कविता मुळे यांच्यासह इतर पदाधिकारी शहरातील रस्ते विकासाचा आढावा घेत असतानाच नांदेडमध्ये अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एका प्राध्यापकाची कार थेट १० फूट खोल खड्ड्यात कोसळली. दोन दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे येथील रस्ता खचला आणि हा गंभीर अपघात झाला. या अपघातात सुदैवाने प्रा. चंद्रशेखर एंगडे हे बचावले आहेत; मात्र शहरातील अंतर्गत रस्ते विकासाचा एक भीषण चेहराही पुढे आला आहे. याच रस्त्यावरून हजारो विद्यार्थी दररोज ये जा करतात आज पावसामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याची माहितीही पुढे आली आहे.

नांदेड महापालिकेत आज भाजपाची सत्ता आहे. पहिल्यांदाच भाजपाची सत्ता नांदेड महापालिकेत आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि अभिनव भारत शिक्षण संस्थेचे जुने नाते आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेते या महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमास उपस्थित राहतात; मात्र या महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्याच्या जागे संदर्भात काही नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे हा रस्ता रखडला गेला असल्याचा खुलासा उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी या घटनेनंतर गुरुवारी माध्यमांसमोर केला आहे; पण हजारो विद्यार्थी, व्यापारी या रस्त्यांवरून दररोज ये जा करत असतात या दयनीय रस्त्यावरून चालताना त्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या रस्त्याची सुधारणा होणे गरजेचे होते; मात्र त्याकडे महापालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सत्ता स्थापनेनंतरही दुर्लक्षच केले आहे. विशेष म्हणजे या प्रभागातील चारही नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले आहेत.

नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पावसाचे उशिरा आगमन झाले आहे. त्यात गेल्या दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस सुरू आहे. गुरुवारी पहाटेपासूनच  पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसामध्ये हवामान विभागाने थेट रेड अलर्ट दिल्यानंतर महापालिकेत महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विभाग प्रमुखांची शहरातील रस्ते विकासावर चर्चा केली जात होती. ही चर्चा झाल्यानंतर काही वेळातच नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ हा गंभीर अपघात झाल्याची माहिती पुढे आली. प्राध्यापक एंगडे यांनी खाजगी यंत्रणा वापरून आपली खड्ड्यात पडलेली कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नव्हते. तोपर्यंत समाज माध्यमाद्वारे या घटनेची माहिती संपूर्ण शहरभर पसरली होती. त्यामुळे या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे उपमहापौर दीपकसिंह रावत आणि इतर नगरसेवक घटनास्थळी धावले. त्यांनी महापालिकेच्या यंत्रणेला पाचारण करत अग्निशमन विभागामार्फत जवळपास दहा फूट खड्ड्यात पडलेली कार बाहेर काढली. सुदैवाने या अपघातात प्राध्यापक ऐंगडे हे बचावले आहेत. त्यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून थेट बाहेर उडी घेतली आणि आपला जीव बचावला.

शहरातील प्रमुख रस्ते आजघडीला सुव्यवस्थेत असले तरीही अनेक रस्ते अर्धवट आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांची कामे दिले आहेत. गेल्या वर्षानुवर्ष ही कामे सार्वजनिक विभागाकडून सुरूच आहेत. महापालिकेतकडून अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतरही त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य रस्त्यांची ही अवस्था असताना अंतर्गत रस्ते मात्र महापालिकेने थेट वाऱ्यावरच सोडले आहेत. परिणामी थोड्याशाही पावसाने रस्ते जलमय होत असून नागरिकांना गुडघ्या इतक्या पाण्यातून आपले घर गाठावे लागत आहे. अंतर्गत रस्त्यांची ही समस्या नगरसेवकांना लक्षात येत असली तरीही नगरसेवकांनाही आता हतबल होण्याशिवाय पर्याय राहिला राहिला नाही. सत्ताधारी असो की विरोधक असो त्यांनाही महापालिकेत जुमानले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!