
नांदेड – नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प यंदा पहिल्यांदाच तुडुंब भरला आहे. या प्रकल्पात आजघडीला ९२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. परिणामी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्प तुडूंब भरल्याने नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता दूर झाली आहे.
यंदा पावसाळ्यातील जून आणि जुलैच्या शेवटपर्यंत पावसाने ताण दिला होता. पिकांची परिस्थिती चिंताजनक होती; मात्र निसर्गाने दोन-तीन दिवसातच हे चित्र पालटले. अखेरीस जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच झालेल्या दमदार पावसामुळे नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प एक ऑगस्ट रोजी तुडूंब भरला आहे. विष्णूपुरी प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे आता प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागणार आहेत; परिणामी गोदावरीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांनी मालमत्तेचे पशुधनाची वेळ भटी साहित्य तसेच इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन विष्णुपुरी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरीस ४१८.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या १०२ टक्के हा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ८९१.३० इतकी आहे. जुलै अखेरीस ४०७.७० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना जिल्ह्यात ४१६.७० मिमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या 46.97% पाऊस जिल्ह्यामध्ये झाला आहे. गतवर्षी जुलैअखेर एकूण सरासरीच्या ८५.१० टक्के पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा हा पाऊस जास्त असल्याने आता प्रकल्पामध्ये जलसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. पिकांची परिस्थितीही उत्तम असल्याने आता सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
एका दिवसातच पालटले चित्र..! डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात ३१ जुलै रोजी सकाळी ४२.२७ जलसाठा होता. प्रकल्पात ३६.९१ दशलक्ष घनमीटर पाणी होते. ३१ जुलै रोजी प्रकल्पात संपूर्ण पावसाळ्यातील एकूण ७.५७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली होती. त्यामध्येही ३१ जुलैची आवक ही ६.७४ दशलक्ष घनमीटर इतकी होती. प्रकल्पात प्रकल्प क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आणि एका दिवसातच चित्र बदलले हा प्रकल्प तुडूंब झाला. परिणामी नांदेडकर आनंदी झाले आहेत. नांदेड महापालिकेनेही आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे.



