क्राईम

बळजबरीने फोटो, व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी, नांदेडमध्ये चार महिलांसह एका युवकाला अटक

भाग्यनगर पोलिसांनी केली तात्काळ कारवाई, सोन्याच्या अंगठीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, खंडणी, हनी ट्रॅप व सायबर स्वरूपाच्या गुन्ह्यात नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

नांदेड – कामानिमित्त बोलवून एका व्यक्तीचे बळजबरीने काढलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा गंभीर प्रकार भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासात पाच आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

नांदेडमध्ये एका व्यक्तीला ३१ जुलै रोजी एका महिलेने मोबाईलवर संपर्क साधून ड्रायव्हरची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना भाग्यनगर येथील ढवळे कॉर्नरजवळ बेलानगर परिसरात बोलावण्यात आले. तक्रारकर्ता घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या महिलेसह इतर तीन महिलांनी आणि एका पुरुषाने त्यांना बोलण्यात गुंतवून जवळील एका घरात नेले. घरात नेल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराचे हात पकडून जबरदस्तीने त्याच्या अंगावरील शर्ट काढून बनियनवरचे मोबाईल फोनद्वारे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर आरोपींनी हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तक्रारदाराला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यांनी तक्रारदाराच्या हातातील आठ ग्राम सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. यानंतर जिवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या सर्व प्रकारानंतर तक्रारदार भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात भाग्यनगर ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विनोद देशमुख आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यामध्ये शीला सुनील भदरगे वय ३९, रा. बेलानगर नांदेड, इंदुबाई विठ्ठलराव बाऱ्हाटे वय ५५, संतोषनगर नांदेड, सुनिता रमाकांत सोनकांबळे वय ५५ वर्षे सप्तगिरी कॉलनी नांदेड रेखा रामचंद्र इंगोले वय ४५ रा. देगावचाळ आणि अमन मारुती कांबळे वय २२ वर्षे रा. पालीनगर या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दोन स्कुटी, विविध कंपन्यांचे चार मोबाईल, एक ऑटो तसेच सोन्याची अंगठी असा जवळपास ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधीकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विशाल माळवे, विष्णुकांत मुंडे, सुधाकर मलदोडे, राजीव घुले, मपोहेकॉ सविता केळगंद्रे, नागनाथ चापके, राहुल लाटकर, अदनान पठाण, अंकुश कांबळे व्यंकटेश गांगुलवार यांनी पार पाडली.

दरम्यान, अनोळखी व्यक्तीकडून नोकरी, व्यवसायिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एकांतस्थळी बोलावल्यास पुरेशी खातरजमा करावी. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. भाग्यनगर ठाणे प्रकरणातील आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांना लुबाडण्याचे प्रयत्न केले आहेत. या अशा पिडीत नागरिकांनी तात्काळ भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहेत. नागरिकांनी अशा गुन्हेगारांच्या दबावाला बळी न पडता तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यास अशा टोळ्यावर प्रभावी कारणे प्रभावी कारवाई करणे अधिक सुलभ होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलीस कटीबद्ध असून अशा प्रकारच्या खंडणी, हनी ट्रॅप व सायबर स्वरूपाच्या गुन्ह्यात कठोर कारवाई सातत्याने करण्यात येत असल्याचेही नांदेड पोलीस दलाने स्पष्ट केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!