
नांदेड – फायनान्सचे हप्ते थकीत असल्याने आठ दिवसांपूर्वीच एक पल्सर दुचाकी एजन्सीमध्ये जमा केल्यानंतर धमकावलेल्या बिगानिया गँगने २५ वर्षीय इंदरजीतसिंघ बलजीतसिंघ बावरी याचा भरदिवसा डेअरी परिसरातील धनेगावकर पेट्रोल पंपावर शनिवारी भरदिवसा चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर नांदेडमध्ये पुन्हा एकदा बिगानिया गँग सक्रिय झाली असल्याचेच स्पष्ट झाले आहे. केबी गँगचा मुख्य सदस्य असलेल्या नितीन बिगानिया, दिलीप डाकोरे, किन्ना परदेशी आणि इतर सदस्यांनी भरदिवसा हा खून केला आहे. त्याचवेळी इतवारा ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केला आहे. २४ तासातच घडलेल्या खुनाच्या या दोन घटना आता पोलिसांना तपासाचे आव्हान देणाऱ्याच ठरल्या आहेत. फायनान्स थकल्याने गाडी ओढून आणल्याचे कारण सांगितले जात असले तरीही या खुनाचे अन्य काही कारण आहे काय याचा तपासही पोलिसांना आता करावा लागणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुना कौठा येथील संत गाडगेबाबा सोसायटी येथील इंदरजीतसिंघ बलजीतसिंघ बावरी वय २५ वर्षे आणि चुलत भाऊ मनजीतसिंघ बावरी हे शनिवारी दुपारी १ च्या सुमारास एमएच २६ सीयु ३४७३ क्रमांकाच्या दुचाकीने शिकारघाटकडे निघाले होते. त्यावेळी दूध डेअरीजवळ पेट्रोल भरण्यासाठी धनेगावकर पेट्रोल पंपावर ते दीड वाजता थांबले असता दुचाकीवरून आलेल्या नितीन बिगानिया आणि किन्ना परदेशी यांनी मारहाण करीत फायनान्सचा हप्ता थकलेली गाडी सोडण्यास सांगितले असतानाही ती गाडी का आणली असे म्हणत वाद घातला. हातातील लाकडाने मारहाण करण्यास प्रारंभ केला. त्याचवेळी आणखी एक दुचाकी तेथे आली. त्या दुचाकीवरून आलेल्या दिलीप डाकोरे याने खंजीरने इंदरजीतसिंघला भोसकले. यावेळी नितीन बिगानिया याने इंदरजीतसिंघला पकडले होते. घटनेदरम्यान सोबत असलेल्या मनजीतसिंघ बावरी याने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. यादरम्यानच आणखी एक मोटर सायकल तेथे आली. यावर असलेले दोघेजण रस्त्यावर पाळत ठेवून होते. चाकू हल्ल्यानंतर नितीन बिगानिया, दिलीप डाकोरे, किन्ना परदेशी आणि त्याच्या सोबतचे इतर तिघेजण असे तीन मोटार सायकलवर बसून धनेगावच्या दिशेने निघून गेले.
त्यानंतर जखमी इंदरजीतसिंघला पाहिले असता तो गंभीर अवस्थेत पडला होता. त्यावेळी मनजीतसिंघने आपला मोठा भाऊ करणसिंघ बावरी याला फोन करून घडलेली माहिती दिली. काही वेळाने करणसिंघ हा गाडी घेऊन आला. इंदरजीतसिंघला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी इंदरजीतसिंघला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. इंदरजीतसिंघला याला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दुसरीकडे शहरातील बाफना परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून शुक्रवारी रात्री खून केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेतील मयताची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत तिघेजण संशयित असल्याची बाब सीसीटीव्हीतील काही दृश्याद्वारे स्पष्ट होत आहे. त्या तिघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेमागचे कारणही अद्याप अस्पष्टच आहे. इतवारा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, इंदरजीतसिंघ खून प्रकरणात आठ दिवसांपूर्वी इंदरजीतसिंघ आणि मनजीतसिंघ या दोघांनी नांदेड शहरातील हिंगोली गेट येथून एक दुचाकी फायनान्सचे हप्ते पेंडिंग असल्यामुळे पाटील एंटरप्राइजेस या एजन्सीमध्ये ओढून आणली होती. गाडी जमा केल्यानंतर दिलीप डाकोरे याने आणलेली गाडी सोडून देण्यास सांगितले तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्याचवेळी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मनजीतसिंघ आणि इंदरजीतसिंघ हे गुरुद्वाराकडे जात असताना रवी नगर कौठा येथे नितीन बिगानियाची बहीण ज्योती बिगानिया आणि नितीनची पत्नी अंजली बिगानिया यांनीही पुन्हा एकदा ती गाडी सोडून दे अन्यथा तुमचा खून करू, अशी धमकी दिली होती. एकूणच धमकीनंतर इंदरजीतसिंघचा बिगानिया गँगने २४ तासाच्या आत खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दिलीप डाकोरे, नितीन बिगानिया, किन्ना परदेशी आणि इतर तिघांनी हा खून केला असल्याची तक्रार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



