महापालिका

सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मोटेगावकरचे बॅनर नांदेडमध्ये दिमाखात उभे..!

महापालिकेच्या अवैध बॅनर विरोधातील मोहिमेवर प्रश्नचिन्ह, पोलीस विभागाचा इशाराही ठरला फुसकाच..!

नांदेड – संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर आजघडीला सीबीआयच्या कोठडीत आहे. याच मोटेगावकरचे मोठमोठे होर्डिंग्स नांदेड शहरात मोक्याच्या ठिकाणावर मोठ्या दिमाखात आजही उभे असल्याने महापालिकेच्या अनधिकृत मोहिमेवर प्रश्नचिन्ह उद्भवले आहे. त्याचवेळी पोलिसांनीही कोणताही रेकॉर्डवरील गुन्हेगार बॅनरवर दिसल्यास तात्काळ कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले होते; मात्र पोलिसांनीही या बॅनरकडे का डोळेझाक केली असावी असा प्रश्न पुढे येत आहे.

नांदेड शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने आरसीसी क्लासेसच्या जाहिरातीत मोटेगावकरचा फोटो मोठ्या दिमाखाने झळकत आहे. हे बॅनर शहरातील मुख्य ठिकाणावर असताना ते काढण्याचे धाडस अजूनही महापालिका अथवा पोलीस विभाग दाखवू शकला नाही. नांदेडमध्ये १५ मे रोजी महापालिका, पोलीस विभाग त्याचवेळी सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनधिकृत बॅनर संदर्भाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोणत्याही विनापरवानगी बॅनरवर महापालिका निश्चितपणे कारवाई करेल त्याचवेळी पोलीस विभागाकडूनही थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शहरात अनधिकृत बॅनरची संख्या निश्चितपणे कमी झाली आहे.

महापालिकेने अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल केले आहेत. हे गुन्हे एका बांधकाम व्यवसायिकावर करण्यात आले असले तरीही कोचिंग क्लासेसला मात्र महापालिका विशेष सूट देत आहे का असा प्रश्न पुढे येत आहे. त्यातही देशभरात गाजत असलेल्या आणि सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या आरसीसीच्या संचालक मोटेगावकरच्या फोटो असलेल्या बॅनरकडे महापालिका का दुर्लक्ष करत आहे हा पहिला प्रश्न आहे. त्याचवेळी खुद्द पोलीस अधीक्षकांनीही एखादा गुन्हेगाराचे बॅनर शहरात लागले असतील तर त्यावर पोलीस विभागाकडून कारवाई केली जाईल असे १५ मे च्या बैठकीत स्पष्ट केले होते. असे असताना सीबीआयच्या कोठडीत असलेल्या मोटेगावकरचे छायाचित्र असलेले असलेले भव्यदिव्य बॅनर शहरांमध्ये झळकत आहेत. त्यामुळे शहरवासीय या बॅनरबाबत निश्चितपणे आश्चर्य व्यक्त करत आहे. खाजगी ठिकाणावर असलेल्या या बॅनरवर महापालिकेच्या शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई केली जाऊ शकत नाही, अशी बाबही पुढे आली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयातूनच या बॅनरवर कारवाई करणे अपेक्षित आहे. लातूरमध्ये मोटेगावकरशी संबंधित मालमत्तांची चौकशी केली जात आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई सत्र सुरू आहे. असे असताना नांदेडमध्ये मात्र मोटेगावकरला अभयच मिळत आहे. हे अभय का दिले जात आहे? हाही संशोधनाचा विषय आहे.

नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे पालक हे बॅनर बघून संताप व्यक्त करत आहेत. आपल्या पाल्यांचे भवितव्य धुळीस मिळवणाऱ्या या मोटेगावकरच्या बॅनरवर महापालिका, पोलीस विभाग का कारवाई करत नाहीत असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा या गंभीर प्रकरणातील आरोपी असलेल्या आणि सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या या बॅनरबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकांनी कळवूनही त्याकडे डोळेझाकच केली जात आहे. याचे नेमके कारण काय असावे असा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे.

महापालिका राजकीय दबावाखाली..? नांदेड शहरात मुख्य ठिकाणावर झळकत असलेल्या बॅनरबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे; मात्र कोणत्याही विभागाकडून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धुळीस मिळवणाऱ्या आणि सध्या सीबीआय कोठडीत असलेल्या मोटेगावकरचे बॅनर काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. मोटेगावकरचे बॅनर काढण्यासाठी महापालिकेवर राजकीय दबाव असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी केला आहे. पोलिसांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गुन्हेगारांचे छायाचित्र असलेले बॅनरबाबत कठोर कारवाई करू अशी भूमिका घेतली होती;मात्र त्यांच्याकडूनही निराशाच होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!