
नांदेड – सागवान तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चिखली बु. येथे पोलिसांनी मोठ्या फौज फाट्यासह शुक्रवारी भल्या पहाटे सर्च ऑपरेशन करत २०० घनफूट सागाचा साठा जप्त केला आहे. या पोलीस कारवाईदरम्यान अडथळा आणणाऱ्या २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन किनवट हद्दीतील चिखली बु.येथे ३१ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेपासून पोलीस विभाग, वनविभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे सर्च आणि चेंकिग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे, फरारी आरोपी, सागवान तस्कर, वाहन चोर यांना चेक करण्यात आले.
दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे चिखली गावाच्या शेजारील गावामध्ये राखीव जंगलातील सागवानी झाडाची अवैध कत्तल करून त्याचे फर्निचर तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने घरात व घराशेजारी ठेवलेला २०० घनफूट अवैध सागवान लाकडाचा साठा, सागी कट साईज, इमारती सागी माल व तीन वाहने असा एकूण ७ ते ८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई करत असताना सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या २५ ते ३० आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०० ते २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग… सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, उपवनसंरक्षक केशव वाबळे, उपवनसंरक्षक बी.एन.स्वामी यांचे निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सहा. वनसंरक्षक गणेश गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड, रोहित जाधव, सचिन धनगे, उमेश ढगे, अमोल काशीकर, मोटार वाहन निरीक्षक तापकीर, पोलीस निरीक्षक बिर्ला, चोपडे, काशीकर, पोलीस निरीक्षक मुळे, जाधवर, सहा. पोलीस निरीक्षक झाडे तसेच पोलीस विभाग, वनविभाग, प्रादेशिक परीवहन विभाग यांचे इतर २०० ते २५० अधिकारी व अमंलदार यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.