
नांदेड – काँग्रेसच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी दोन दिवसापूर्वी करण्यात आलेल्या राजेश पावडे यांच्या नियुक्तीला थेट महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांना विश्वासात न घेता पावडे यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या राजेश पावडे यांना नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्ती दिली होती. त्यांना तिकीट न मिळाल्याने काहीतरी जबाबदारी द्यावी अशी मागणी पुढे आली होती. या नियुक्तीसाठी नांदेड उत्तरचे पूर्वीचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांना पदोन्नती देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. नांदेडमध्ये शुक्रवारी पावडे यांच्या जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळ्याचा आनंदोत्सवही जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात साजरा करण्यात आला होता. मात्र पावडे यांच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदाला खुद्द खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांचा विरोध होता. त्यांचे मत विचारात न घेता ही नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाकडे नाराजी नोंदवली होती. नांदेडचे खासदार चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही विचारात न घेता ही नियुक्ती करण्यात आल्याची बाब आता पुढे आली आहे. ही बाब चेन्नीथला यांच्या लक्षात येताच नांदेडसह नवी मुंबई येथील नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदाचा राजेश पावडे यांचा हा आनंद औट घटकेचाच ठरला आहे. त्यातच काँग्रेसमध्ये निर्माण झालेली दुफळी ही आता जिल्हास्तरापासून ते थेट राज्यस्तरावर असल्याचेच या नियुक्ती रद्दच्या आदेशातून पुढे आली आहे. त्यातच आता आगामी काळात नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे निर्णय हे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांना डावलून होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहेत.