
नांदेड – नांदेड महापालिकेला २०२४-२५ मध्ये तब्बल ३०४ कोटींची करवसुली मालमत्ताधारकांकडून करायची आहे. यामध्ये चालू वर्षाचा ९३ कोटींचा तर मागील थकबाकी ही २१२ कोटींची आहे. महापालिकेने यावर्षी शंभर टक्के मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शास्ती माफी योजनाही राबविण्यात येत आहे. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीवरील शास्तीत ४० टक्के सूट देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कर वसुलीसाठी विशेष वसुली पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जानेवारी अखेर महापालिकेने ५२ कोटींची कर वसुली केली आहे.
नांदेड महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कर वसुलीसाठी विशेष वसुली पथकाची स्थापना केली आहे. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची जप्ती, मालमत्ता सील करणे, नळ जोडणी किंवा ड्रेनेज बंद करणे यासारख्या अप्रिय कारवायाही केल्या जात आहेत. आतापर्यंत महापालिकेने ४३ मालमत्ता व भूखंडाची जप्ती केली आहे. संबंधितांनी कर भरणा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताचे इमारती आणि भूखंड अटकावणी करण्यात आली आहे. त्याचवेळी २८ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवरील ड्रेनेज आणि नळ पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड महापालिकेच्या थकीत कराचा भरणा करावा या उद्देशाने कर भरणाऱ्या नागरिकांना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शास्तीवरील रकमेत ४० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. शास्ती माफीच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
जानेवारी २०२५ अखेर महापालिकेची ५२ कोटींची कर वसुली…जानेवारी २०२५ अखेर नांदेड महापालिकेने ५२ कोटी ३ लाख ९४ हजार ५८४ रुपयांची थकीत करवसुली केली आहे. यामध्ये सर्वाधिक १३ कोटी ४७ लाख ६४ हजार १६४ रुपयांची करवसुली ही क्षेत्रिय कार्यालय क्रमांक दोन अशोकनगर ने केली आहे. जानेवारी २०२४ मध्ये हाच आकडा ४४ कोटी ७८ लाख ६१ हजार ६०१ रुपये इतका होता. त्या तुलनेत सहा कोटी रुपये अधिकची कर वसुली महापालिकेने यावर्षी केली आहे. नांदेड शहरातील जवळपास ५० हजार मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर अदा केला आहे. उर्वरित मालमत्ता धारकांनीही थकीत मालमत्ता कराचा भरणा करून अप्रिय कारवाई टाळावी तसेच शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन उपायुक्त कर विभाग अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे.