
नांदेड – मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध कार्यालये आता कात टाकत आहेत. त्यामध्ये नांदेड महापालिकाही आता पुढे सरसावली असून तब्बल १५ वर्षानंतर महापालिकेच्या विविध विभागांची रंगरंगोटी केली जाणार आहे. त्याचवेळी आवश्यक ते कामही केले जाणार आहेत. प्रामुख्याने महापालिकेतील स्थायी समिती सभागृहासह आयुक्तांच्या बैठक कक्षाचेही नुतणीकरण केले जाणार आहे. महापालिका मुख्यालयासह वजीराबाद, इतवारा आणि सिडको क्षत्रिय कार्यालयांनाही सुसज्ज केले जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, उपायुक्त सुप्रिया टवलारे यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी करून आवश्यक कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गतिमान कारभार करण्यासाठी ई ऑफिसचेही नियोजन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या सर्व विभागांना भेटी देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने यामध्ये स्थायी समिती सभागृह, आयुक्तांचा बैठक पक्षाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्याचवेळी महापालिकेतील लेखा आणि धनादेश विभाग एकत्र करण्याचे आयुक्त डोईफोडे यांनी निर्देश दिले आहेत. प्रत्येक माळ्यावर अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध करून दिले जाईल. महापालिकेत हिरकणी कक्ष, पाळणाघर निर्माण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वजीराबाद इतवारा आणि सिडको कार्यालयाचेही आधुनिकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.