
नांदेड – नांदेड शहरामध्ये पहिल्यांदाच वृक्ष पुनर्रोपणाचा प्रयोग यशस्वी झाला असून नांदेड महापालिकेने डिसेंबर २०२४ मध्ये प्रायोगिक तत्वावर केलेल्या दोन पिंपळ वृक्षासह गुलमोहर वृक्षाचा पुनर्रोपण प्रयोग यशस्वी झाला आहे. आगामी काळात नांदेड महापालिका या यशस्वी प्रयोगानंतर शहरातील विविध ठिकाणचे आणि सार्वजनिक रस्त्यामध्ये अडथळा ठरणारे जुने वृक्ष यशस्वीरित्या पुनर्रोपित करण्यास सज्ज असल्याची माहिती नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.
नांदेड महापालिका हद्दीत डिसेंबर २०२४ मध्ये शहरातील कलामंदिर परिसर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील तब्बल ७० वर्षाच्या जुन्या पिंपळ वृक्षाचे आणि एक गुलमोहर अशा एकूण तीन वृक्षाचे पुण्याच्या घोरपडे अँड असोसिएशन या तज्ज्ञ एजन्सीच्या मदतीने डंकीन परिसरातील नव्या एसटीपी प्रकल्प परिसरात पुनर्रोपण करण्यात आले. हे तीनही वृक्ष यशस्वीरित्या पुनर्रोपित होऊन या तीनही वृक्षांना आता छान नवीन पालवी फुटली आहे.
नांदेड महापालिकेकडून पर्यावरण संवर्धनाकरीता करण्यात येणाऱ्या उपाययोजनेअंतर्गत नांदेड शहरात रस्ते विकासामध्ये बाधित होणारे याच प्रकारची महत्त्वाची जवळपास १०० जुनी वृक्ष पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. यासाठी नांदेड महापालिकेची एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात नांदेड शहरात १०० वृक्षांचा वृक्षांचे यशस्वीरित्या पुनर्रोपण करण्याचा नांदेड महानगरपालिकेचा मानस असल्याची प्रतिक्रिया उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. फरहतउल्ला बेग यांनी दिली.
नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले, महानगरपालिकेच्या हद्दीत वृक्ष आच्छादन वाढवण्याच्या च्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या मान्सून हंगामात महापालिकेच्या एकूण ६ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ८५ ठिकाणी एकूण २६ हजार १२५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. पुढील वर्षात हे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ४० हजारापर्यंत ठेवण्यात आले आहे. शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात १० पटीच्या प्रमाणामध्ये भरपाई करून वृक्षांची लागवड करण्याच्या अटीवर संबंधित यंत्रणांना परवानगी देण्याचे धोरण महापालिकेने अवलंबिले असल्याचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.